उदो...उदो..च्या जयघोषात जतच्या यलम्मा देवी यात्रेला प्रारंभ; भक्तांनी लिंब नेसून फेडला नवस
जत, प्रतिनिधी
महाराष्ट्र, आंध्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या, नवसाला पावणाऱ्या श्री यलम्मा देवीच्या यात्रेस सोमवारी गंधोटीने प्रारंभ झाला. 'आईचा उदो उदो' च्या जयघोषात आज लाखो भाविकांनी यल्लमादेवीचा लिंब व गंध लेवून आपला नवस फेडला. पहिल्या दिवशी सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
जत नगरिची ग्रामदेवता असलेल्या व नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या या देवीच्या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेचा पहिला दिवस म्हणजे श्री.यल्लमा देवी यात्रेचा गंधोटगीचा दिवस. या दिवशी जे भाविक नवस बोलतात. देवी नवस फेडते या भावनेने भाविक महिला व पुरूष देवीच्या मंदिर परिसरात असलेल्या पाण्याच्या कुंडामध्ये स्नान करून ओल्या अंगाने गंध लावून कमरेला लिंबाचे डहाळे ठेवून देवीच्या मंदिरासभोवती प्रदक्षिणा घालतात. यलम्मा आईच्या नावाने उदो उदोच्या जयघोषात देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. काही भाविक मंदिरासमोर दंडवत घालून आपला नवस फेडला. सकाळपासूनच श्री यल्लमादेवीचे दर्शन व गंध घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.भल्या पहाटेच देविचे पुजारी श्री.सुभाष व स्वप्नील कोळी यांनी श्री. यल्लमादेवीची अतिशय सुंदर अशी पूजा व आरास केली होती.
श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे व सचिव श्रीमंत ज्योत्स्नाराजे डफळे आदीनी यात्रेकरूंना चांगल्याप्रकारे देविचे दर्शन घेता यावे यासाठी संपूर्ण नियोजन केले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख श्री.बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनिल साळुंखे व पोलीस निरीक्षक श्री.राजेश रामाघरे यांनी यात्रा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तब्ब्ल 235 पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
तसेच यात्रेत मोक्याच्या ठिकाणी टेहळणी मनोरे उभे केले असून सि.सि.टी.व्ही.च्या माध्यमातून यात्रेवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच ट्रस्टच्या वतीने पिण्याचे पाणी, वैधकीय दवाखाना, व इतर सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. यात्रेत मोठ्याप्रमाणात करमणूकीची साधने,आकाशी पाळणे,मौत का कुआ,पन्नालाल गाढव ,मेरी गो पाळणे,मिकी माऊस, भेळपुरी, चायनिज दुकाने, मेवामिठाई दुकानासह विविध व्यवसाईक आले आहेत.
तसेच सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीच्यावतीने कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे.यात्रेत खिलार जातीची जनावरे आली आहेत. या कृषी प्रदर्शनचे उदघाटनही आज प्रभारी जिल्हा अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते व सभापती सुजय नाना शिंदे यांच्या अध्यक्षतेखालि करण्यात आले.
दरम्यान, यात्रेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, तहसिलदार जिवन बनसोडे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, संगली कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.सुजय उर्फ नाना शिंदे,श्रीमती कांचनमाला शिंदे ,सौ.श्रध्दा शिंदे आदीनी श्री.यल्लमादेवी यात्रेस भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
यल्लमादेवी प्रतिष्ठान चे स्वयंसेवक मोहन माने-पाटील, बारू शिंदे, कैलास गायकवाड, गणपतराव कोडग, अनिल शिंदे, संग्राम राजेशिर्के, कुमार इंगळे,श्रीकृष्ण पाटील, मोहन चव्हाण, वसंत जाधव, सलिम शेख, सलिम गवंडी, श्रीकांत सोनावने, विजय कोळी, पापा संनदी, चंद्रकांत कोळी, सावंत आदी कार्यकर्ते यात्रा सुरळीत व चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी प्रयत्न करीत आहेत.