जपानचा हॉकी संघ बिहारमध्ये दाखल
हॉकी संघ/ वृत्तसंस्था/ राजगीर (बिहार)
आगामी येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या हिरो पुरस्कृत आशिया चषक पुरुषांच्या हॉकी स्पर्धेसाठी जपानच्या पुरुष हॉकी संघाचे राजगीरमध्ये आगमन झाले आहे. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये जपानच्या पुरुष हॉकी संघाने 5 पैकी 4 वेळेला चौथे स्थान मिळविले आहे. पण जपानला अद्याप ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या ताज्या मानांकनात जपान 18 व्या स्थानावर आहे.
राजगीरमध्ये होणाऱ्या पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत जपान अ गटात असून या गटात यजमान भारत, चीन आणि कझाकस्तान यांचा समावेश आहे. जपान संघाच्या या स्पर्धेतील मोहिमेला 29 ऑगस्टपासून कझाकस्तानबरोबरच्या सामन्याने सुरुवात होत आहे. मलेशिया हॉकी संघाचे राजगीरमध्ये शनिवारी रात्री उशिरा आगमन झाले. 2024 च्या जकार्ता येथील आशिया चषक हॉकी स्पर्धेत जपानला कोरियाकडून 1-2 अशा गोलफरकाने हार पत्करावी लागली होती.