जपान मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा आजपासून
वृत्तसंस्था / कुमामोटो (जपान)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 500 दर्जाच्या कुमामोटो मास्टर्स जपान सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत भारताचे पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन हे आपला हरवलेला सूर मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहतील. या स्पर्धेत विविध देशांचे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू सहभागी होत आहेत.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन हे सूर मिळविण्यासाठी आतापर्यंत झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळते. डेन्मार्क खुल्या 750 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. तर लक्ष्य सेनचे डेन्मार्क खुल्या आणि आर्किटीक खुल्या सुपर 500 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान लवकरच समाप्त झाले होते. फिन्लँड येथे झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला पहिल्याच फेरीत कॅनराच्या मिचेली ली कडून पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती. मात्र ओडेनेसी स्पर्धेत तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. उपांत्यपूर्व फेरीत तिला इंडोनेशियाच्या पॅरिस ऑलिम्पिक कास्यपदक विजेत्या तूनजंगकडून हार पत्करावी लागली होती. पी. व्ही. सिंधूला आता अनुप श्रीधर आणि कोरियाचे ली सेयोन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. मंगळवारपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेत 23 वर्षीय लक्ष्य सेनचा सलामीचा सामना मलेशियाच्या लीआँग हेओशी होणार आहे. महिला दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.