रोमांचक सामन्यात भारताचा आफ्रिकेवर विजय
आफ्रिका 11 धावांनी पराभूत : तिलक वर्माचे पहिले शतक, अभिषेक शर्माचेही तुफानी अर्धशतक
वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
येथील सेंच्युरियन पार्क स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर दणकेबाज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना तिलक वर्माचे नाबाद शतक व अभिषेक शर्माच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 6 बाद 219 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकन संघाला 7 बाद 208 धावापर्यंत मजल मारता आली. टीम इंडियाने हा सामना 11 धावांनी जिंकत चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मार्को यान्सेनने शेवटच्या काही षटकात जोरदार फटकेबाजी करत आफ्रिकेसाठी विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या पण शेवटच्या षटकात तो बाद झाला अन आफ्रिकन संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. उभय संघातील चौथा व शेवटचा सामना दि. 15 रोजी होईल.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि सलामीच्या षटकातच संजू सॅमसनने आपली विकेट गमावली. सॅमसन सलग दुसऱ्या सामन्यात खातेही न उघडता बाद झाला. मात्र, त्यानंतर अभिषेक आणि तिलक यांनी डावाची धुरा सांभाळली आणि दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. पहिल्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरलेल्या अभिषेकने या सामन्यात मात्र तुफानी फलंदाजी केली. आफ्रिकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना अवघ्या 24 चेंडूत अर्धशतक झळकावले. अर्धशतक झळकावल्यानंतर अभिषेक 25 चेंडूत 3 चौकार व 5 षटकारासह 50 धावा करून बाद झाला.
तिलक वर्माचे नाबाद शतक
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला कर्णधार सूर्यकुमार यादव फार काळ टिकला नाही. 1 धावा काढून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिक पंड्याला 18 धावांवर केशव महाराजने माघारी धाडले. लागोपाठ दोन गडी बाद झाल्यानंतर तिलकने रिंकू सिंगसोबत संघाचा डाव सावरला. या जोडीने 58 धावांची भागीदारी साकारली. यादरम्यान, तिलक वर्माने डायनॅमिक शैलीत फलंदाजी करत 19 व्या षटकात 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने पहिले टी 20 शतक झळकावण्याची कामगिरी केली. पहिले शतक ठोकल्यानंतर तो मैदानात पळत सुटला. वर्माने नाबाद 107 धावा फटकावल्या. दुसरीकडे, रिंकूला प्रभावी कामगिरी करता आली नाही. तर पहिला आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळणाऱ्या रमणदीप सिंगने धडाक्यात सुरुवात करताना 6 चेंडूत 1 चौकार व 1 षटकारासह 15 धावा केल्या. शेवटच्या षटकात तो धावबाद झाला. तिलक वर्माच्या या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 6 बाद 219 धावा केल्या.
आफ्रिकन फलंदाजांची निराशा
टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 220 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकात रिकल्टन 20 धावांवर बाद झाला. तर रिझा हेंड्रिक्सलाही केवळ 21 धावा करता आल्या. कर्णधार मॅरक्रम, ट्रिस्टन स्टब्ज व मिलर यांना फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही. याउलट हेन्रिक क्लासेन व मार्को यान्सेन मात्र शेवटच्या काही षटकात जोरदार फटकेबाजी करत सामना रोमांचक स्थितीत आणला. क्लासेनने 22 चेंडूत 41 धावांचे योगदान दिले तर यान्सेनने आक्रमक खेळताना अवघ्या 17 चेंडूत 4 चौकार व 5 षटकारासह 54 धावांच पाऊस पाडला. शेवटच्या षटकात तो अर्शदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला. यान्सेन बाद झाल्यानंतर आफ्रिकेच्या विजयाच्या आशा मावळल्या. त्यांना 7 बाद 208 धावापर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकांत 6 बाद 219 (संजू सॅमसन 0, अभिषेक शर्मा 25 चेंडूत 50, तिलक वर्मा 56 चेंडूत 8 चौकार व 7 षटकारासह नाबाद 107, सूर्या 1, हार्दिक पंड्या 18, रिंकू सिंग 8, रमणदीप सिंग 15, अक्षर पटेल नाबाद 1, केशव महाराज व सिमलेन प्रत्येकी दोन बळी, यान्सेन एक बळी).
दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 7 बाद 208 (रिकल्टन 20, रिझा हेड्रिक्स 21, ट्रिस्टन स्टब्ज 12, मॅरक्रम 29, मिलर 18, क्लासेन 22 चेंडूत 41, मार्को यान्सेन 17 चेंडूत 54 धावा, अर्शदीप सिंग 3 बळी, वरुण चक्रवर्ती 2 बळी, अक्षर व हार्दिक प्रत्येकी एक बळी).
तिलक टी 20 शतक झळकावणारा दुसरा युवा खेळाडू
तिलक टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा भारताचा दुसरा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. तिलकने वयाच्या 22 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे. त्याच्याआधी यशस्वी जैस्वालनेही शतक झळकावले होते. यशस्वीने वयाच्या 21 वर्षे 279 दिवसांत शतक झळकावले. यशस्वीने नेपाळविरुद्ध शतक झळकावले होते. तिलकने आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात 107 धावांची नाबाद शतकी खेळी साकारली.
हिरो झाला झिरो
संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली. 4 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने शतक झळकावले. पण दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. सलग दोन सामन्यांमध्ये तो शून्यावर आऊट झाला आहे. यासह संजू हा भारतीय यष्टीरक्षक ठरला जो सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाला. 17 सामन्यांत तो 0 वर 5 वेळा आऊट झाला आहे. यापूर्वी हा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर होता, जो 54 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4 वेळा शून्यावर बाद झाला होता.