जपान पंतप्रधानपदी प्रथमच महिला विराजमान
साने ताकाची यांची नेतेपदी निवड : नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अभिनंदन
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानमध्ये मंगळवारी साने ताकाची यांची पंतप्रधानपदी निवड झाली. त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात झालेल्या निवडणुकीत ताकाची यांनी 237 विरुद्ध 149 मतांनी विजय मिळवला. खालच्या सभागृहानंतर त्या वरिष्ठ सभागृहातही निवडून आल्या. पहिल्या फेरीत बहुमतापेक्षा एक मत कमी पडल्यानंतर, त्या दुसऱ्या फेरीत 125-46 च्या फरकाने विजयी झाल्या. पंतप्रधान झाल्यापासून मोदी आणि ट्रम्प सारख्या जागतिक नेत्यांनी ताकाची यांचे अभिनंदन केले आहे.
जपानमध्ये पहिल्यांदाच एका महिलेला पंतप्रधानपदाची संधी मिळाली आहे. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने (एलडीपी) माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाची यांची नवीन गटनेत्या म्हणून निवड केल्यानंतर आता त्यांची पंतप्रधान म्हणून वर्णी लागली आहे. जपानमध्ये बहुमत असलेल्या पक्षाच्या अध्यक्षाची पंतप्रधानपदी निवड होणार असल्यामुळे त्या पुढील पंतप्रधान होतील हे जवळजवळ निश्चित होते. ताकाची ह्या माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. शिंजो जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले आणि त्यांना चीनविरोधी नेते मानले जातात.
ताकाची ह्या मजबूत लष्करी, कठोर स्थलांतर धोरणे आणि जपानच्या शांततावादी संविधानात सुधारणांचे समर्थन करतात. या महिन्याच्या सुरुवातीला, ताकाची एलडीपीच्या नेत्या म्हणून निवडून आल्या. त्यांनी 2021 आणि 2024 मध्येही पंतप्रधान होण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पुरेसा पाठिंबा मिळू शकला नव्हता. आता ताकाची ह्या शिगेरू इशिबा यांची जागा घेतील. सध्या देशातील लोक महागाईमुळे संतप्त आहेत आणि विरोधी पक्षांना पाठिंबा देऊ लागले आहेत अशावेळी एलडीपीने ताकाची यांची निवड केली आहे.
पंतप्रधान मोदींनी केले ताकाची यांचे अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जपानच्या नवनिर्वाचित पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाची यांचे अभिनंदन केले. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना व्यक्त केल्या. भारत आणि जपानमधील संबंध दृढ होणे हे इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि त्यापलीकडे शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘साने ताकाची, जपानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी मी तुमच्यासोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि त्यापलीकडे शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी आमचे संबंध दृढ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.’ असे ट्विट मोदींनी केले आहे.