जमशेदपूर एफसीचा सलग दुसरा विजय
वृत्तसंस्था / जमशेदपूर
134 व्या ड्युरँड चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या क गटातील सामन्यात जमशेदपूर एफसीने इंडियन आर्मीवर 1-0 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला. क गटातील जमशेदपूरचा हा सलग दुसरा विजय आहे.
जमशेदपूर एफसी आणि इंडियन आर्मी यांच्यातील झालेल्या या सामन्यात मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना आपले खाते उघडता आले नव्हते. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत जमशेदपूर एफसीच्या तुलनेत इंडियन आर्मी संघाचा खेळ अधिक वेगवान आणि दर्जेदार झाला. या कालावधीत इंडियन आर्मी संघातील समीर मुर्मुने दोनवेळा जमशेदपूरच्या गोलपोस्टपर्यंत मजल मारली. पण त्याला या चढायांवर गोल करता आला नाही. पण 52 व्या मिनिटाला कार्तिक चौधरीने हेडरद्वारे दिलेल्या पासचे जमशेदपूर एफसीच्या सनान मोहम्मदने गोलमध्ये रुपांतर केले. सनान मोहम्मदने इंडियन आर्मीच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत चेंडू गोलपोस्टमध्ये अचूकपणे धाडला. त्यानंतर इंडियन आर्मीच्या गोल करण्याच्या किमान दोन संधी जमशेदपूर एफसीच्या भक्कम गोलरक्षणामुळे वाया गेल्या.
त्याचप्रमाणे इंडियन आर्मीचा कर्णधार सुनीलने मध्यंतराला केवळ काही सेकंद बाकी असताना जमशेदपूर संघाच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली. पण त्याला संघाचे खाते उघडता आले नाही. सामना संपण्यास केवळ दोन मिनिटे बाकी असताना लिटॉन शिलने मारलेला फटका गोलपोस्टच्या दांडीला आदळून बाहेर गेल्याने जमशेदपूर एफसीला आपली आघाडी वाढविता आली नाही. जमशेदपूर एफसी संघाने आता क गटातून दोन्ही सामने जिंकत 6 गुण नोंदवित आघाडीचे स्थान मिळविले आहे. जमशेदपूर एफसी संघ आता बाद फेरीत प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहे. मंगळवारच्या सामन्यात जमशेदपूर एफसीला तीन गुण मिळाले.