जम्मू-काश्मिरचा दिल्लीवर ऐतिहासिक विजय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथील फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या ड इलाइट गटातील सामन्यात मंगळवारी जम्मू-काश्मिरने दिल्लीवर ऐतिहासिक पहिल्या विजयाची नोंद केली. जम्मू-काश्मिर संघाला निर्णायक विजयासाठी 124 धावांची गरज असताना चौथ्या दिवशी सलामीवीर कमरान इक्बालने नाबाद 133 धावांची खेळी करीत जम्मू काश्मिरला 7 गड्यांनी दणदणीत विजय मिळवून दिला.
या सामन्यात दिल्लीने पहिल्या डावात 211 धावा जमविल्यानंतर जम्मू-काश्मिरने पहिल्या डावात 310 धावा जमवित दिल्लीवर 99 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर दिल्लीचा दुसरा डाव 277 धावांत आटोपल्याने जम्मू-काश्मिर संघाला निर्णायक विजयासाठी 179 धावांची गरज असून तिसऱ्या दिवसाअखेर त्यांनी दुसऱ्या डावात 2 बाद 55 धावा जमविल्या होत्या. चौथ्या दिवशी इक्बालने मोलाची भूमिका बजावत संघाला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला.त्याने 147 चेंडूत 20 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 133 धावा फटकावल्या. त्यांच्या विजयात वेगवान गोलंदाज सामनावीर अकिब नबी (35 धावांत 5 बळी), कर्णधार पारस डोगरा (106 व नाबाद 10) व इक्बाल यांचे योगदान निर्णायक ठरले.
दिल्लीच्या दुसऱ्या डावात आयुष बदोनीने 73 चेंडूत 72 धावांची खेळी केली. आयुष डोसेजाने 88 चेंडूत 62 धावा जमविल्या. जम्मू-काश्मिर संघातील डावखुरा गोलंदाज वंशज शर्माने 68 धावांत 6 गडी बाद केले. तर साहील लोथ्राने 73 धावांत 3 बळी मिळविले. दिल्लीचा दुसरा डाव 79.1 षटकात 277 धावांवर आटोपला. दिल्लीच्या दुसऱ्या डावात सांगवान आणि अर्पित राणा यांनी सलामीच्या गड्यासाठी 86 धावांची भागिदारी केली. बडोनी बाद झाल्यानंतर मात्र दिल्लीचे फलंदाज झटपट तंबूत परतले. दिल्लीचे शेवटचे पाच फलंदाज केवळ 10 धावांची भर घालत बाद झाले.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली प. डाव 211, जम्मू-काश्मिर प. डाव 310, दिल्ली दु. डाव 277 (बडोनी 72, डोसेजा 62, सांगवान 34, अर्पित राणा 43, वंशज शर्मा 6-68, लोथ्रा 3-73), जम्मू-काश्मिर दु. डाव 43.3 षटकांत 3 बाद 179 (इक्बाल नाबाद 133, पारस डोगरा नाबाद 10, हृतिक शोकीन 2-52).