जम्मू-काश्मीर : एनसी-काँग्रेस आघाडी सरस
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीने बहुमत मिळविले आहे. निवडणुकीत आघाडी केल्यानेच नॅशनल कॉन्फरन्सला सरकार स्थापन करता येणार आहे. भाजपने 29 जागा जिंकत जम्मू क्षेत्रातील स्वत:चा प्रभाव पुन्हा एकदा दाखवून दिला. काश्मीर खोऱ्यात यश न मिळाल्याने भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागणार आहे.
निवडणूकपूर्व आघाडी
नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने निवडणूकपूर्व आघाडी केली, केंद्रशासित प्रदेशात भाजप मोठी राजकीय शक्ती ठरण्याचे आव्हान पाहता दोन्ही पक्षांनी हे पाऊल उचलले होते. या आघाडीमुळे दोन्ही पक्षांची मते एकजूट झाली आणि भाजपविरोधात एक मजबूत पर्याय खोऱ्यातील लोकांना उपलब्ध झाला. नॅशनल कॉन्फरन्सने 51 तर काँग्रेसने 32 जागांवर निवडणूक लढविली होती. तर 5 मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांदरम्यान मैत्रिपूर्ण लढत झाली.
खोऱ्यात भाजप प्रभावहीन
काश्मीर खोऱ्यात भाजपला स्थान निर्माण करता आलेले नाही. तर s जम्मूमध्ये भाजप हाच सर्वात मोठी शक्ती ठरला. भाजपने कलम 370 चा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळे जम्मू क्षेत्रात लाभ झाला, परंतु काश्मीर खोऱ्यात नुकसान झाले आहे. भाजप स्थानिक हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करत नसल्याची भावना तेथे निर्माण झाली.
प्रभावीपणे प्रचार
अब्दुल्ला परिवाराचा काश्मीर खोऱ्यात मोठा प्रभाव आहे. तर जम्मू क्षेत्र हे हिंदूबहुल असल्याने भाजपला तेथे लाभ झाला. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने स्वत:च्या प्रचाराला स्थानिक तक्रारी, कलम 370 पुन्हा लागू करणे आणि राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवर केंद्रीत केले होते. भाजपसोबत आघाडी केल्याबद्दल पीडीपीला एनसीने लक्ष्य केले. तर काँग्रेसने स्थानिक मुद्द्यांना प्राथमिकता दिली. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची भागीदारी महत्त्वपूर्ण होती. राहुल गांधी आणि अन्य नेत्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी अनेक जाहीर सभा घेतल्या.