जांबोटी-ओलमणी भागाला मुसळधार पावसाने झोडपले
सर्वत्र पाणीच पाणी : नागरिकांची तारांबळ : भात पिकाला पोषक वातावरण
वार्ताहर/ जांबोटी
जांबोटी-ओलमणी परिसरात शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपल्यामुळे, या परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची व शेतकरी वर्गाची एकच तारांबळ उडाली. हा पाऊस भातपिकासाठी पोषक मानला जात आहे.
या परिसरात गेल्या आठ दिवसापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने गेल्या सहा महिन्यांपासून कंटाळलेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात उष्म्यामध्ये वाढ झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती.अपेक्षेप्रमाणे शनिवारी सायंकाळी या परिसरात मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह जोरदार परतीच्या पावसाने झोडपल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. सध्या या परिसरातील भातपिकांची पोसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या परिसरातील पाणथळ शेतवडी वगळता माळरानावरील भातपिकासाठी काही प्रमाणात पावसाची आवश्यकता होती. अपेक्षेप्रमाणे शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने भात व रताळी पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरात दिवाळीनंतर भातपिकांची कापणी होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या शेतकरीवर्ग काही प्रमाणात रताळी काढणीच्या कामात गुंतला आहे. मात्र परतीचा पाऊस असाच सुरू राहिल्यास भातपिकांना धोका उद्भवण्याची शक्यता आहे. शनिवारी झालेल्या दमदार परतीच्या पावसामुळे या परिसरातील नदी-नाल्यांना पुन्हा पूर आला आहे.