जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाची दुर्दशा
ओत्तोळीनजीकच्या नाल्यावरील पूल खचला : रस्त्याला डबक्याचे स्वरुप : वाहनधारकांची मोठी गैरसोय
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाची पार दुर्दशा झाली असून, या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज निर्माण झाले आहे. खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. जांबोटी-खानापूर या 18 किलोमीटर रस्त्याचा समावेश जत्त-जांबोटी राज्य महामार्ग क्रमांक 31 अंतर्गत होतो. आंतरराज्य वाहतुकीच्यादृष्टीने खानापूर तालुक्यातील हा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून गोवा- हुबळी-धारवाड आदी ठिकाणी मालवाहतूक व प्रवासी वाहतूक चालते. परंतु या रस्त्याचा दर्जा राज्य महामार्गाचा असला तरी रस्त्याच्या विकासाकडे शासनाचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे सद्यस्थितीमध्ये या रस्त्याची अवस्था बिकट बनली आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे खानापूर ते मोदेकोपपर्यंतच्या रस्त्याची 5.5 मीटर तसेच त्यापुढे जांबोटीपर्यंतच्या घाट व जंगल भागाने व्यापलेल्या रस्त्याची रुंदी केवळ 3.5 मीटर असल्यामुळे अरुंद रस्ता व धोकादायक वळणामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
रस्त्याच्या निम्मा भाग सुस्थितीत आहे. मात्र यावर्षी झालेला मुसळधार पाऊस व वाढत्या अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची अवस्था दयनीय बनली आहे. खानापूर शहराच्या प्रवेशद्वारानजीक जांबोटी क्रॉसवरील मोरीवरील रस्ता खचला असल्यामुळे या ठिकाणी भला मोठा खड्डा पडला आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी दुरुस्त करण्यात आलेल्या कान्सुली फाटा ते मोदेकोप फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे कामकाज निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज पसरले असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीवमुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. तसेच मलप्रभा नदी नजीकच्या शंकरपेट पुलावरील रस्त्याचीही दुर्दशा झाली असून दारोळी फाट्यापासून जांबोटीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडल्यामुळे अरुंद रस्त्यावरून खड्डे चुकवून वाहने चालवताना अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत. तसेच या रस्त्याच्या बाजू पट्ट्यांचे देखील पक्के डांबरीकरण करण्यात आले नसल्याने पावसामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या बाजूपट्ट्या खचून गटारी सदृश चरी पडल्यामुळे रस्त्याच्या बाजूला वाहने चावलणे देखील मुश्कील बनल्यामुळे वाहनधारकांची पंचायत झाली आहे.
ओत्तोळी नाल्यावरील पूल खचला
जांबोटी भागात गेल्या दोन महिन्यापासून मुसळधार अतिवृष्टी सुरूच असल्यामुळे त्याचा फटका या भागातील रस्त्यांना बसला आहे जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावरील ओत्तोळी नजीकच्या नाल्यावरील पुलाचा काही भाग खचल्यामुळे या ठिकाणची वाहतूक धोकादायक बनली आहे. पुलाजवळ असलेल्या रस्त्याचा बराच भाग खचला आहे. या ठिकाणचा रस्ता अरुंद असल्यामुळे रस्त्याचा बराच भाग खचल्यामुळे वाहने चालविताना वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
गणेश चतुर्थीपूर्वी खड्डे बुजवा
सध्या या ठिकाणी खचलेल्या रस्त्याशेजारी प्रशासनाने बॅरिकेड्स लावून वाहनधारकांना धोक्याची सूचना केली असली तरी पावसामुळे पुन्हा रस्ता खचून या रस्त्यावरील वाहतूक कोलमडण्याची शक्यता आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या खानापूर उपविभागाच्या वरिष्ठ साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष घालून गणेश चतुर्थीपूर्वी जांबोटी खानापूर रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहनधारकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.