माउंट एव्हरेस्टवर ‘जाम’
एका दिवसात 200 जण दाखल : मानवी गर्दीमुळे बर्फाचा हिस्सा कोसळला
वृत्तसंस्था/ काठमांडू
जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर ‘जाम’ म्हणजेच मार्गकोंडी झाली आहे. एकाचवेळी 200 गिर्यारोहक 8,790 मीटरच्या उंचीवर असलेल्या साउथ समिट आणि हिलेरी स्टेपवर पोहोचले. 8,848 मीटर उंचीचा माउंट एव्हरेस्ट येथून 200 फुटांच्या अंतरावर आहे. मोठी गर्दी झाल्याने येथील बर्फाचा एक हिस्सा तुटला आहे. यादरम्यान 6 गिर्यारोहक तेथे अडकून पडले, यातील 4 जण दोरखंडाच्या मदतीने तेथून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. तर दोन गिर्यारोहक (एक ब्रिटिश आणि एक नेपाळी) हजारो फूट खाली कोसळून बर्फात गाडले गेले. ही घटना 21 मे रोजी घडली असली तरी याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. हे दोन्ही गिर्यारोहक मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त होतेय.
दोघेही 15 गिर्यारोहकांच्या समुहाचा हिस्सा होते. बर्फाचा हिस्सा तुटल्याने ते साउथ समिटच्या दिशेने कोसळले, याला शिखरावरील डेथ झोन म्हटले जाते, तेथे ऑक्सिजन पातळी अत्यंत कमी असते. बचावकर्मचारी दोन्ही गिर्यारोहकांचा शोध घेत आहेत, परंतु ते वाचण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. या गिर्यारोहणाचे नेतृत्व करणारी कंपनी 8के एक्सपेडिशन्सने बर्फाचा मोठा तुकडा हिलेरी स्टेपवर कोसळला होता असे सांगत तेथून दोन्ही गिर्यारोहक खाली पडल्याची माहिती दिली.
एव्हरेस्ट सर करण्यासाठी 21 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंतचा कालावधीच मंजूर करण्यात आला होता. यामुळे सर्व गिर्यारोहक शिखरावर पोहोचण्यासाठी धडपड करत होते. शिखरावर प्रत्येक गिर्यारोहकाला केवळ दोन मिनिटे थांबण्याची अनुमती मिळाली होती. सर्वसाधारणपणे एव्हरेस्टच्या शिखरावर गिर्यारोहकांना थांबण्यासाठी सुमारे 10 मिनिटांचा कालावधी दिला जातो.
येथे अनेक गिर्यारोहक रांगेत उभे असतात, तसेच येथील हवामान कधीही खराब होऊ शकते. हिमवादळ येण्याची शक्यता असते. याचबरोबर अधिक उंची असल्याने येथे ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी होते. गिर्यारोहक बॅकपॅकयुक्त ऑक्सिजन सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्भर असतात. याच पुरवठ्यावर त्यांना परतावे देखील लागते.