जलसंपदाने सांगलीबाबत चूक सुधारली; 1 हजार क्यूसेक्सने विसर्ग सुरू
सांगली प्रतिनिधी
कोयना धरणातून सांगली शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी आता बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून 1 हजार क्यूसेक्सने पाणी विसर्ग सुरू करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. यापूर्वी 500 क्यूसेक्सने पाणी सोडण्याची चूक विभागाने सुधारली आहे.
जिल्ह्यातील पाणी योजनांसाठी 2100 क्यूसेक्सने सुरू असणाऱ्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्याचा निर्णय सांगलीत पाणीटंचाई निर्माण झाल्याने घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय घेण्यासाठी विलंब झाल्यामुळे कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले होते. परिणामी कोयनेतून सोडलेले पाणी सांगलीला पोहोचण्यास सात दिवस उशीर लागण्याची शक्यता होती. त्यामुळे सांगली शहराचा पाणीपुरवठा आठवडाभर विस्कळीत राहण्याची आणि त्यातून मोठा जनक्षोभ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे रात्रीत आपला निर्णय बदलून 1000 क्यू सेक्सने पाणी विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे साधारण अडीच ते तीन दिवसाच्या कालात हे पाणी सांगली शहरापर्यंत पोहोचू शकेल असा अंदाज आहे.