उचगाव, बसुर्तेत जलनिर्मल योजना कुचकामी
नागरिकांचा पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर : शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता
वार्ताहर /उचगाव
उचगाव, बसुर्ते या गावांमध्ये शासनाच्या जलनिर्मण योजनेअंतर्गत बसविण्यात आलेली ‘जलशुद्धीकरण यंत्रणा’ नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी राबविण्यात आली आहे. मात्र ती सुरू झाल्यापासून अवघ्या काही वर्षातच बंद आहे. पाणीटंचाई तसेच विहिरींनी गाठलेले तळ या सर्वांचा सारासार विचार करता नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी या जलशुद्धीकरण यंत्रणेच्या माध्यमातून जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा संबंधित खात्याने तातडीने करावा अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये 2000 पासून जलनिर्मण योजना राबविली आहे. मात्र, ती सुरू झाल्यापासून व्यवस्थित पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी वाया गेला आहे. नागरिक मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी धडपड करतात. ते पाणी जंतूमिश्रित, गढूळ असल्यास नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. जलशुद्धीकरण यंत्रणेत बिघाड झाल्यास संबंधित खात्याने तातडीने दुरुस्ती करून सुरळीत पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. मात्र, संबंधित खात्याचे सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे ही योजना कुचकामी ठरली आहे. नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली. प्रत्येक गावोगावी ही योजना राबविण्यात आली. यावेळी एका यंत्रणेला सुमारे पाच लाख रुपयांचा निधी पुरवण्यात आला होता. तोही आता वाया जाण्याच्या मार्गावर आहे.
‘यंत्रणा केवळ शोभेची वस्तू’
यंत्रे बसविल्यानंतर सदर योजना काही महिनेच सुस्थितीत राहिली. त्यानंतर योग्य पद्धतीने हाताळणी झाली नसल्याने, ती सध्या बंद पडली आहे. काही समाजकंटकानी या यंत्रणेची मोडतोड केल्याने ती बंद अवस्थेत असल्याने शोभेची वस्तू बनून राहिली आहे. नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले झऱ्याचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी सरकार कमीत कमी खर्चाची जलशुद्धीकरण यंत्रणा गावोगावी उभी करते. मात्र, योग्य देखभालीअभावी नागरिकांना अशुद्धच पाणी मिळते.
काही भागात शुद्ध पाणी
ग्रामीण भागात सध्या पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्यामध्ये क्लोराईड, फ्लोराईड हार्डनेस, लोह, नायट्रेट, विविध क्षार, आम्ल, विविध धातू तसेच रोगजंतू मिसळलेले आढळून आले आहेत. पिण्याच्या पाण्याची तपासणी केल्यानंतर हे सर्व दिसून येते. त्यामुळे ग्रामीण जनतेच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सध्या अनेक गावांमधून मुतखडा, कॅन्सर, हिवताप, हगवन असे अनेक आजार उद्भवत असून नागरिक त्याला बळी पडत आहेत.