सर्वाधिक लोकसंख्येचे शहर ठरले जकार्ता
टोकियोला टाकले मागे
वृत्तसंस्था/ जकार्ता
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर ठरले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नव्या अध्ययनानुसार जकार्ताने यादीत पहिले स्थान मिळवत जपानची राजधानी टोकियोला मागे टाकले आहे. या अध्ययनात नव्या निकषाचा वापर करत अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची यादी जारी करण्यात आली आहे. या यादीत नवी दिल्ली आणि कोलकात्याचे नावही सामील आहे.
युएन डिपार्टमेंट ऑफ
इकोनॉमिक अँड सोशल अफेयर्सच्या वर्ल्ड अर्बनायजेशन प्रॉस्पेक्ट-2025 च्या अहवालात जकार्ता शहरात 4.2 कोटी लोक राहत असल्याचे म्हटले गेले आहे. हे प्रमाण कुठल्याही अन्य शहराच्या तुलनेत सर्वाधिक आहे. जकार्ता हे 1970 च्या दशकापर्यंत काही दशलक्ष लोकसंख्या असलेले शहर होते. परंतु अलिकडच्या वर्षांमध्ये जकार्ताची लोकसंख्या अत्यंत वेगाने वाढली आहे.
दिल्ली अन् ढाका शहराची लोकसंख्या
जकार्तानंतर बांगलादेशच्या राजधानीत सर्वाधिक लोकसंख्या आहे. ढाका शहराची लोकसंख्या 3.7 कोटी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर 3.3 कोटी लोकसंख्येसह टोकियो आहे. दिल्लीची लोकसंख्या 3.02 कोटी आहे. तर चीनमधील शांघाय शहरात 2.96 कोटी, ग्वांगझूमध्ये 2.76 कोटी, फिलिपाईन्सच्या मनीला शहरात 2.47 कोटी लोक राहतात. यानंतर कोलकाता शहरात 2.25 कोटी तर दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये 2.25 कोटी लोकसंख्या आहे.
अशियाई शहरांचा दबदबा
सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आशियाचा दबदबा आहे. युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत आशियाई शहरांमध्ये अधिक लोकसंख्या आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या 33 महानगरांपैकी 19 आशियातील आहेत. 1950 नंतर शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या दुप्पट झाली आहे.