जैस्वाल 40 हून अधिक कसोटी शतके झळकावणार : मॅक्सवेल
वृत्तसंस्था/मेलबर्न
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने युवा भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालचे कौतुक केले असून तो 40 हून अधिक कसोटी शतके झळकावू शकणारा आणि भविष्यात असंख्य विक्रम मोडीत काढण्याची ताकद बाळगणारा खेळाडू असल्याचे म्हटले आहे. पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर या 22 वर्षीय सलामीवीराने बॉर्डर-गावसकर मालिकेतील पहिल्या कसोटीदरम्यान पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाच्या जबरदस्त माऱ्याविरुद्ध दुसऱ्या डावात 161 धावांची आक्रमक खेळी केली होती. ‘दि ग्रेड क्रिकेटर पॉडकास्ट’वर बोलताना मॅक्सवेलने जैस्वालसोबत आयपीएलमध्ये खेळण्याच्या अनुभवांची आठवण करून दिली. त्यावेळी तो किशोरवयीन होता. त्याने जैस्वालच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा क्षणही यावेळी सांगितला. यावर्षीच्या इंग्लंडविऊद्धच्या मायदेशातील मालिकेत जैस्वालने नाबाद 214 च्या सर्वोत्कृष्ट धावसंख्येसह पाच सामन्यांमध्ये 89 च्या सरासरीने 712 धावा जमविल्या. यात दोन द्विशतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश राहिला.
मॅक्सवेलने जैस्वालच्या सर्व प्रकारांत वर्चस्व गाजवण्याच्या क्षमतेवर भर दिला आणि हा युवा फलंदाज ऑस्ट्रेलियासाठी मोठे आव्हान ठरू शकतो, असा इशारा दिला. ‘जैस्वालमध्ये फारसा कमकुवतपणा आहे असे वाटत नाही. तो आखूड टप्प्याचे चेंडूही चांगल्या प्रकारे हाताळतो, सुंदरपणे ड्राईव्ह हाणतो, अपवादात्मक पद्धतीने फिरकी खेळतो आणि दीर्घ कालावधीसाठी दबाव पेलू शकतो. तो कदाचित 40 पेक्षा जास्त कसोटी शतके झळकविणार आहे आणि अनेक विक्रम मोडणार आहे. कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्याची क्षमता अविश्वसनीय आहे. जर आम्ही त्याला आगामी सामन्यांमध्ये रोखण्याचा मार्ग शोधला नाही, तर त्याचे आव्हान खूप कठीण होऊ शकते. त्याच्याकडे चांगल्या पायांच्या हालचाली आणि प्रत्येक गोष्टीला उत्तरे आहेत’, असे मॅक्सवेल याप्रसंगी म्हणाला.
15 कसोटी सामन्यांमध्ये जैस्वालने 58.07 च्या सरासरीने चार शतके आणि आठ अर्धशतकांसह 1,568 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 214 अशी आहे आणि त्याची सर्व शतके 150 किंवा त्याहून अधिक धावसंख्येत रूपांतरित झाली आहेत. हे सर्व सामने ‘आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या 2023-25 च्या स्पर्धेदरम्यान झालेले असून त्यात जैस्वाल इंग्लंडच्या ज्यो रूटच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर आहे. रूटने 19 सामन्यांमध्ये 1,750 धावा केल्या आहेत, ज्यात सहा शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. जैस्वालचा मायदेशातील विक्रमही उल्लेखनीय आहे. त्याने 10 कसोटींत 60.61 च्या सरासरीने 1,091 धावा काढल्या आहेत आणि 76.29 च्या स्ट्राइक रेटसह दोन शतके आणि सात अर्धशतके झळकावली आहेत. बॉर्डर-गावसकर मालिकेतील दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून अॅडलेड, ओव्हल येथे दिवस-रात्र खेळविली जाणार असून त्यात गुलाबी चेंडूचा सामना जैस्वालला करावा लागेल.