गुकेशचा लिरेनला पहिला झटका, ‘टाईम कंट्रोल’वर विजयाची नोंद
वृत्तसंस्था/सिंगापूर
भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गतविजेत्या डिंग लिरेनवर आपला पहिला विजय नोंदवला असून तिसऱ्या फेरीत ‘टाईम कंट्रोल’वर चिनी खेळाडूवर मात करत त्याने त्याच्याशी बरोबरी साधली आहे. पहिल्या लढतीत काळ्या सेंगट्यांसह खेळताना वाईट रीतीने पराभव पत्करावा लागलेल्या गुकेशला त्याने केलेल्या भरपूर तयारीचा फार फायदा झाला. त्यामुळे वेळेच्या बाबतीत त्याला मोठी अनुकूलता प्राप्त झाली. लिरेनने खेळाच्या पहिल्या टप्प्यात त्याच्या चाली करण्यासाठी बराच वेळ घालवला. मंगळवारी दुसरा सामना अनिर्णीत अवस्थेत संपला होता. दोन्ही खेळाडूंचे आता प्रत्येकी 1.5 गुण झाले आहेत.
‘मला खूप छान वाटत आहे. गेल्या दोन दिवसांतील माझ्या खेळावर मी खूष आहे. बुधवारी माझा खेळ अधिक चांगला झाला. मला पटावर खेळताना चांगले वाटते आणि मी माझ्या प्रतिस्पर्ध्यावर मात करू शकलो. अशी घडामोड नेहमीच छान असते’, असे पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळलेल्या गुकेशने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले. 13 व्या चालीची नोंद होईपर्यंत चेन्नईच्या या 18 वर्षीय तऊणाने वेळेच्या बाबतीत एका तासाची आघाडी घेतली होती. कारण लिरेनने घेतलेल्या एक तास आणि सहा मिनिटांच्या तुलनेत त्याने फक्त चार मिनिटे घालवली. पहिल्या 120 मिनिटांत 40 चाली करायच्या असल्याने गुंतागुंतीच्या मधल्या खेळात लिरेनवर अपेक्षित परिणाम झाला आणि गुकेशने त्याच्यावरील दबाव वाढवताना काही कठीण, पण परिपूर्ण चाली केल्या.