शिंजो आबे यांच्या पत्नीला भेटले जयशंकर
पंतप्रधान मोदींनी लिहिलेले पत्र केले सुपूर्द
वृत्तसंस्था/ टोकियो
विदेशमंत्री एस. जयशंकर सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. जयशंकर यांनी शुक्रवारी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या पत्नी अकी आबे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे पत्र अकी आबे यांना सोपविले आहे. भारत-जपान संबंध मजबूत करण्यासाठी आबे यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख जयशंकर यांनी यावेळी केला आहे.
तत्पूर्वी जयशंकर यांनी विदेशमंत्री स्तरीय बैठकीत भाग घेतला. भारत-जपान संबधांमध्ये नेहमीच जटिलता राहणार आहे, परंतु यासोबत नव्या संधी देखील निर्माण होणार आहेत. अशा स्थितीत भारत आणि जपानला परस्परांशी संपर्क कायम राखावा लागणार असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंधांवरून व्यापक चर्चा केली आहे. प्रमुख क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय सैन्य राजस्थानात जपानच्या स्वरक्षण दलांसोबत संयुक्त सराव करत असल्याचे जयशंकर यांनी सांगितले आहे.
दोन्ही देशांनी शिक्षण, पर्यटन आणि संस्कृतीच्या माध्यमातून लोकांदरम्यान संपर्क वाढविण्याच्या पद्धतींवर चर्चा केली आहे. भारतीय पर्यटक आणि अन्य नागरिकांसाठी जपानचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी व्हिसा व्यवस्थेच्या आवश्यकतेवरही चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी दिली आहे.
पुढील ‘टू प्लस टू’ मंत्रिस्तरीय संवादासाठी भारतात जपानच्या विदेश मंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी जयशंकर यांना चीन ग्लोबल साउथचा हिस्सा आहे का अशी विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी ग्लोबल साउथ शिखर परिषदेत चीन सहभागी झाला नव्हता अशी आठवण करून दिली आहे. क्वाड हा समूह हवामान बदलावरही चर्चा करतो. क्वाडने ऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या मुद्द्यावरही चर्चा केली आहे. परंतु आण्विक ऊर्जेवर या समुहात अद्याप चर्चा झाली नसल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले.