रशियाकडून जयशंकर यांचे कौतुक
कच्चे तेल खरेदीचा मुद्दा
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी युक्रेन युद्धादरम्यान भारत आणि रशिया यांच्या द्विपक्षीय संबंधांना वृद्धींगत केल्याबद्दल विदेशमंत्री एस. जयशंकर यांचे कौतुक केले आहे. रशियासोबत भारताने व्यापार का सुरू ठेवला आहे अशी विचारण पाश्चिमात्य देशांनी केली होती. यावर जयशंकर यांनी समर्पक उत्तर देत पाश्चिमात्य देशांचे तोंड बंद केले होते अशी आठवण लावरोव्ह यांनी रशियातील शहर सोचीमध्ये आयोजित जागतिक युवा मंचाला संबोधित करताना करून दिली आहे.
भारत नेहमीच रशियाचा मित्र राहिला आहे. माझे मित्र, विदेशमंत्री जयशंकर यांनी रशियासोबतच्या व्यापारासंबंधीच्या प्रश्नावर संबंधितांना इतरांच्या विषयात नाक न खुपसण्याचा सल्ला दिला होता. भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे सुरूच ठेवले असल्याचे लावरोव्ह यांनी स्पष्ट केले.
पाश्चिमात्य देशांनी भारताला आधुनिक शस्त्रास्त्रs पुरविण्यास कधीकाळी नकार दिला होता. त्यावेळी रशियाने भारताला शस्त्रास्त्रs पुरविली तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले ब्राह्मोससारखे क्षेपणास्त्र संयुक्तपणे विकसित केले. याचमुळे आम्ही मैत्रीला महत्त्व देतो. रशिया कधीच ही मैत्री विसरत नाही. भारतीय लोकांमध्ये देखील हाच गुण असल्याचे उद्गार लावरोव्ह यांनी काढले आहेत.