जयपूर पँथर्स, पुणेरी पलटण विजयी
वृत्तसंस्था / जयपूर
2025 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या सामन्यात जयपूर पिंग पँथर्सने बंगाल वॉरियर्सचा 45-41 अशा चार गुणांच्या फरकाने पराभव केला तर दुसऱ्या एका सामन्यात पुणेरी पलटणने दमादर विजय मिळविताना यु मुम्बाचे आव्हान 40-22 असे संपुष्टात आणले.
जयपूर पँथर्स आणि बंगाल वॉरियर्स यांच्यातील हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. यजमान जयपूर पिंक पँथर्सतर्फे नितीनकुमार आणि अली समादी यांनी प्रत्येकी सुपर 10 गुण नोंदविले. या दोघांच्या कामगिरीमुळेच जयपूर पँथर्सला हा सामना जिंकता आला. या विजयामुळे आता जयपूर पिंक पँथर्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. हा सामना सुरू झाल्यानंतर देवांक दलालने सातव्यांदा सलग सुपर 10 गुण मिळविले. तर मनप्रित प्रदीप तसेच अशिष मलिक यांनी प्रत्येकी 5 गुण घेतले. देवांग दलालने या सामन्यात आपल्या पहिल्याच चढाईवर जयपूरला गुण मिळवून दिले. प्रो कब•ाr लीग स्पर्धेतील देवांग दलाल हा सर्वात वेगवान चढाईपटू म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या चढायांवर 400 गुण मिळविण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम त्याने केवळ 38 सामन्यात गाठला आहे. जयपूर पिंक पँथर्सतर्फे नितीनकुमारची खेळी दर्जेदार झाली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांमध्ये बरोबरी होती. पण खेळाच्या दुसऱ्या सत्रात जयपूर पँथर्सचा खेळ बंगाल वॉरियर्सच्या तुलनेत अधिक वेगवान आणि अचूक झाल्याने जयपूर पिंक पँथर्सने हा सामना केवळ चार गुणांच्या फरकाने जिंकला.
पुणेरी पलटण विजयी
या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात पुणेरी पलटणने यु मुम्बाचा 40-22 असा एकतर्फी पराभव केला. पुणेरी पलटणने 20 टॅकल गुण मिळविले असून त्यामध्ये 6 गुण सुपर टॅकलमध्ये घेतले आहे. या सामन्यातील विजयामुळे पुणेरी पलटणने स्पर्धेच्या गुणतक्त्यात आपले आघाडीचे स्थान अधिक मजबूत केले आहे. पुणेरी पलटणतर्फे गुरूदीपने 5 तर गौरव खत्री आणि अभिनेश नेदारजन यांनी प्रत्येकी 4 गुण मिळविले. स्टुअर्ट सिंगने सामन्यातील शेवटच्या मिनिटांत आपल्या चढायांवर 8 गुण वसुल केले. पुणेरी पलटणची बचावफळी अधिक भक्कम असल्याने यु मुम्बाला गुण मिळविणे कठीण झाले. सामन्यातील मध्यंतरापर्यंत पुणेरी पलटणने यु मुम्बावर 15-10 अशी आघाडी घेतली होती. या लढतीतील शेवटचे सत्र सुरू होण्यापूर्वी पुणे पलटणने यु मुम्बावर 23-15 अशी आघाडी घेतली होती. या सत्रामध्ये रिंकुने यु मुम्बाला 4 गुण मिळवून दिले. पण गुरुदीपने 5 गुण घेतले. गौरव खत्रीने यु मुम्बाचे सर्वगडी बाद केले. स्टुअर्स सिंगने शेवटच्या दोन मिनिटांत आपल्या सुपर चढाईवर 8 गुण संघाला मिळवून देत यु मुम्बाचे आव्हान 40-22 असे संपुष्टात आणले.