पर्तगाळीत आज घुमणार जय श्रीराम जय श्रीराम
पंतप्रधान करणार आशियातील : सर्वांत उंच श्रीराममूर्तीचे अनावरण,जिवोत्तम मठाची सार्ध पंचशताब्दी
पणजी : श्री गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाजवळ उभारण्यात आलेल्या आशियातील सर्वांत उंच आणि भव्य अशा 77 फूट उंचीच्या श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचे आज 28 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्तगाळी जिवोत्तम मठाधीश श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या उपस्थितीत अनावरण करणार आहेत. यानिमित्त काणकोणच्या सरकारी तसेच खासगी शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या मूर्तीचे अनावरण केल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदी मठाचे अनुयायी आणि भाविकांना संबोधित करणार आहेत. त्याअगोदर पंतप्रधान श्री रामदेवाचे दर्शन घेणार आहेत. पंतप्रधानांच्या स्वागताची त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी गोवा सरकारने ठेवली असून स्वत: मुख्यमंत्री सावंत, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, मठ समितीचे अध्यक्ष धेंपे या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत.
पर्तगाळी मठाजवळ नियंत्रण कक्ष
दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी खास पर्तगाळी मठाजवळ नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. काणकोणचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलिस निरीक्षक यांचा समावेश करून हा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. लोलये येथील कळमठ, श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थान, शेळेर येथील सरकारी माध्यमिक विद्यालय, पैंगीण येथील पोटके मैदान, श्री परशुराम मंदिर, हत्तीपावल येथील मोकळे मैदान, पर्तगाळची मोकळी जागा त्याच प्रमाणे मठाच्या अन्य परिसरांत खास वाहन तळांची सोय करण्यात आली आहे आणि या वाहन तळांपासून खास बसेस, रिक्षांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मठ प्राकारात पोलिस दल, अन्य सुरक्षा दल त्याचप्रमाणे 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अग्निशामक दल आणि अन्य अत्यावश्यक सुविधांचीही सोय करण्यात आली आहे.