महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जय शहा यांची नवी ‘इनिंग’ !

06:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्रिकेटच्या जगतातील भारताचा प्रचंड दबदबा हा निर्विवाद असून आता त्यालाच बळ देणारी आणखी एक घडामोड म्हणजे नुकतीच ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे’च्या अध्यक्षपदी झालेली जय शहा यांची निवङ..‘आयसीसी’चं मुख्यालय दुबई इथं असून 1 डिसेंबर या दिवशी ते पदभार स्वीकारतील...शहा यांच्या ‘गुजरात क्रिकेट संघटना’ ते ‘आयसीसी’ या प्रवासावर यानिमित्तानं टाकलेली ही नजर...

Advertisement

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी म्हटलंय की, ‘त्यांच्या’जवळ क्रांतिकारक योजना असून क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्याची क्षमता ‘त्यांच्यात’ लपलीय...तर ‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यानुसार, ‘त्यांचं’ वर्णन ‘दूरदर्शी व्यक्तिमत्व’ असं केल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये. ‘त्यांच्या’ कारकिर्दीत हा खेळ खात्रीनं जगभरात पोहोचेल...भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर व्यक्त करण्यात आलेल्या या दोन प्रतिक्रिया...फक्त 35 वर्षीय शहा यांनी ‘आयसीसी’चे अजूनपर्यंतचे सर्वांत तरुण अध्यक्ष बनण्याचा मान मिळविलाय...जय यांना संधी मिळालीय ती सध्याचे अध्यक्ष न्यूझीलंडचे अॅटर्नी ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्यांदा सिंहासनावर बसण्यास नकार दिल्यानं...

Advertisement

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची सूत्रं सांभाळणारे जय शहा हे पाचवे भारतीय...यापूर्वी स्व. जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांनी ही जबाबदारी पेललीय...प्रत्येक ‘आयसीसी’ अध्यक्षाला प्रत्येकी दोन वर्षांच्या कार्यकाळाची तीन वेळा संधी मिळते अन् बार्कले यांनी चार वर्षं पूर्ण केली होती. शहा हे एकमेव इच्छुक उमेदवार असल्यानं निवडणूक घेण्याची पाळीच आली नाही...100 पेक्षा जास्त सदस्य असलेल्या ‘इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल’मधील जय शहा यांच्या लोकप्रियतेचं दर्शन जुलैमध्ये कोलंबोनं आयोजित केलेल्या वार्षिक बैठकीतच घडलं होतं...दरम्यान, ‘आयसीसी’नं म्हटलंय की, शहा यांच्या निवडीमुळं एका नवीन अध्यायाला प्रारंभ झालेला असून क्रिकेटचा विस्तार जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात होईल...

‘बीसीसीआय’ला जय शहा यांच्या जागी आता नव्या सचिवांची निवड करावी लागणार ती संघटनेच्या घटनेनुसार एका व्यक्तीला दोन पदं भूषविण्याची मान्यता नसल्यानं. ते यावेळी दुसऱ्यांदा सचिवपदावर विराजमान झाले होते. घटननुसार, येत्या वर्षी त्यांना हे पद सोडावं लागणारच होतं...नवीन जबाबदारी पेलताना शहा यांचं आता सारं लक्ष केंद्रीत झालेलं असेल ते अमेरिकेतील आगामी ऑलिम्पिकवर...‘मी ‘आयसीसी’मधील माझ्या सहकाऱ्यांच्या सहकार्यानं क्रिकेटचं जागतिकीकरण मार्गी लावण्यासाठी नेटानं काम करेन. 2028 सालच्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटला सामील करून घेण्यात आल्यानं या खेळाची वृद्धी होण्यास प्रचंड साहाय्य मिळणार असून मला खात्री आहे की, अभूतपूर्व पद्धतीनं क्रिकेट भविष्यात पुढं झेपावेल’, शहा यांचे निवडीनंतरचे शब्द...

जय शहा यांना मनापासून वाटतंय की, क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारानं लोकप्रियता मिळविण्याची गरज असून ते टिकून राहायला हवेत. त्यांच्या मते, आता आवश्यकता आहे ती नवं तंत्रज्ञान स्वीकारण्याची अन् विश्वातील विविध बाजारपेठांना धडक देण्याची...शहा यांना जबरदस्त राजकीय वरदहस्त लाभलाय हे नाकारता येणार नसलं, तरी त्यांचं प्रशासकीय कौशल्य देखील वेळोवेळी दिसून आलंय...

जय शहा यांनी सर्वप्रथम लक्ष वेधून घेतलं ते गुजरात क्रिकेट संघटनेमध्ये 2013 साली सहसचिव म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर. त्यावेळी अध्यक्ष होते त्यांचे वडील नि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...तत्कालीन मोटेरा स्टेडियमचं 1 लाख 32 हजार आसन क्षमता असलेल्या जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियममध्ये रुपांतर करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात आघाडीवर होते ते जयच...2020 मध्ये याच ठिकाणी ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम होऊन त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग राहिला...त्याच्या पुढच्या वर्षी 2021 साली पहिली कसोटी आयोजित करण्यात येऊन त्याचं नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असं करण्यात आलं. गेल्या वर्षी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचा अंतिम सामना झाला तो याच मैदानावर...

कोव्हिडच्या काळात जागतिक स्तरावर बहुतेक खेळ ठप्प झालेले असताना ‘आयपीएल’ला मात्र ब्रेक लागणार नाही याची शहा यांनी काळजी घेतली. त्यातून 2020 ची स्पर्धा संपूर्णपणे संयुक्त अरब अमिरातीत ‘बायो बबल’मध्ये खेळली गेली...त्याच्या पुढच्या वर्षी स्पर्धा भारतात खेळविली गेली खरी. परंतु सुरू झाल्यानंतर कोव्हिडची मोठी लाट नव्यानं उठल्यानं ती स्थगित करण्याचा प्रसंग ओढवला. ‘आयपीएल’नंतर पुन्हा एकदा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळविण्यात आली...

‘आयसीसी’ अध्यक्ष म्हणून जय शहा यांना पहिलं आव्हान पेलावं लागेल ते पाकिस्तानमधील ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’चं. ‘एशियन क्रिकेट कौन्सिल’चे अध्यक्ष या नात्यानं ते ‘हायब्रीड मॉडेल’चे भक्कम पुरस्कर्ते राहिलेत. त्यामुळंच गेल्या वर्षीची ‘आशिया चषक’ स्पर्धा पाकिस्तानबरोबर श्रीलंकेतही रंगली होती. शहा यांची आता पेचातून वाट काढताना कसोटी लागेल. कारण भारत सरकार क्रिकेट संघाला पाकिस्तानला जाण्याची परवानगी देण्याची शक्यता दुरापास्तच...त्याशिवाय आवश्यक निधीची व्यवस्था करून कसोटी क्रिकेटची लोकप्रियता टिकवून ठेवणं, एकदिवसीय सामन्यांचं महत्त्व राखणं आणि जगभरातील ‘टी-20 लीग’कडे खेळाडूंचा मुक्तपणे लोटणारा ओघ रोखणं हेही त्यांच्यासमोरील महत्त्वाचे मुद्दे असतील !

‘इनिंग’ची सुरुवात...

‘बीसीसीआय’मधील उदय...

पाडला पैशांचा पाऊस...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article