For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जय शहा यांची नवी ‘इनिंग’ !

06:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
जय शहा यांची नवी ‘इनिंग’
Advertisement

क्रिकेटच्या जगतातील भारताचा प्रचंड दबदबा हा निर्विवाद असून आता त्यालाच बळ देणारी आणखी एक घडामोड म्हणजे नुकतीच ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे’च्या अध्यक्षपदी झालेली जय शहा यांची निवङ..‘आयसीसी’चं मुख्यालय दुबई इथं असून 1 डिसेंबर या दिवशी ते पदभार स्वीकारतील...शहा यांच्या ‘गुजरात क्रिकेट संघटना’ ते ‘आयसीसी’ या प्रवासावर यानिमित्तानं टाकलेली ही नजर...

Advertisement

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी म्हटलंय की, ‘त्यांच्या’जवळ क्रांतिकारक योजना असून क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्याची क्षमता ‘त्यांच्यात’ लपलीय...तर ‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यानुसार, ‘त्यांचं’ वर्णन ‘दूरदर्शी व्यक्तिमत्व’ असं केल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये. ‘त्यांच्या’ कारकिर्दीत हा खेळ खात्रीनं जगभरात पोहोचेल...भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर व्यक्त करण्यात आलेल्या या दोन प्रतिक्रिया...फक्त 35 वर्षीय शहा यांनी ‘आयसीसी’चे अजूनपर्यंतचे सर्वांत तरुण अध्यक्ष बनण्याचा मान मिळविलाय...जय यांना संधी मिळालीय ती सध्याचे अध्यक्ष न्यूझीलंडचे अॅटर्नी ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्यांदा सिंहासनावर बसण्यास नकार दिल्यानं...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची सूत्रं सांभाळणारे जय शहा हे पाचवे भारतीय...यापूर्वी स्व. जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांनी ही जबाबदारी पेललीय...प्रत्येक ‘आयसीसी’ अध्यक्षाला प्रत्येकी दोन वर्षांच्या कार्यकाळाची तीन वेळा संधी मिळते अन् बार्कले यांनी चार वर्षं पूर्ण केली होती. शहा हे एकमेव इच्छुक उमेदवार असल्यानं निवडणूक घेण्याची पाळीच आली नाही...100 पेक्षा जास्त सदस्य असलेल्या ‘इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल’मधील जय शहा यांच्या लोकप्रियतेचं दर्शन जुलैमध्ये कोलंबोनं आयोजित केलेल्या वार्षिक बैठकीतच घडलं होतं...दरम्यान, ‘आयसीसी’नं म्हटलंय की, शहा यांच्या निवडीमुळं एका नवीन अध्यायाला प्रारंभ झालेला असून क्रिकेटचा विस्तार जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात होईल...

Advertisement

‘बीसीसीआय’ला जय शहा यांच्या जागी आता नव्या सचिवांची निवड करावी लागणार ती संघटनेच्या घटनेनुसार एका व्यक्तीला दोन पदं भूषविण्याची मान्यता नसल्यानं. ते यावेळी दुसऱ्यांदा सचिवपदावर विराजमान झाले होते. घटननुसार, येत्या वर्षी त्यांना हे पद सोडावं लागणारच होतं...नवीन जबाबदारी पेलताना शहा यांचं आता सारं लक्ष केंद्रीत झालेलं असेल ते अमेरिकेतील आगामी ऑलिम्पिकवर...‘मी ‘आयसीसी’मधील माझ्या सहकाऱ्यांच्या सहकार्यानं क्रिकेटचं जागतिकीकरण मार्गी लावण्यासाठी नेटानं काम करेन. 2028 सालच्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटला सामील करून घेण्यात आल्यानं या खेळाची वृद्धी होण्यास प्रचंड साहाय्य मिळणार असून मला खात्री आहे की, अभूतपूर्व पद्धतीनं क्रिकेट भविष्यात पुढं झेपावेल’, शहा यांचे निवडीनंतरचे शब्द...

जय शहा यांना मनापासून वाटतंय की, क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारानं लोकप्रियता मिळविण्याची गरज असून ते टिकून राहायला हवेत. त्यांच्या मते, आता आवश्यकता आहे ती नवं तंत्रज्ञान स्वीकारण्याची अन् विश्वातील विविध बाजारपेठांना धडक देण्याची...शहा यांना जबरदस्त राजकीय वरदहस्त लाभलाय हे नाकारता येणार नसलं, तरी त्यांचं प्रशासकीय कौशल्य देखील वेळोवेळी दिसून आलंय...

जय शहा यांनी सर्वप्रथम लक्ष वेधून घेतलं ते गुजरात क्रिकेट संघटनेमध्ये 2013 साली सहसचिव म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर. त्यावेळी अध्यक्ष होते त्यांचे वडील नि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...तत्कालीन मोटेरा स्टेडियमचं 1 लाख 32 हजार आसन क्षमता असलेल्या जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियममध्ये रुपांतर करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात आघाडीवर होते ते जयच...2020 मध्ये याच ठिकाणी ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम होऊन त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग राहिला...त्याच्या पुढच्या वर्षी 2021 साली पहिली कसोटी आयोजित करण्यात येऊन त्याचं नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असं करण्यात आलं. गेल्या वर्षी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचा अंतिम सामना झाला तो याच मैदानावर...

कोव्हिडच्या काळात जागतिक स्तरावर बहुतेक खेळ ठप्प झालेले असताना ‘आयपीएल’ला मात्र ब्रेक लागणार नाही याची शहा यांनी काळजी घेतली. त्यातून 2020 ची स्पर्धा संपूर्णपणे संयुक्त अरब अमिरातीत ‘बायो बबल’मध्ये खेळली गेली...त्याच्या पुढच्या वर्षी स्पर्धा भारतात खेळविली गेली खरी. परंतु सुरू झाल्यानंतर कोव्हिडची मोठी लाट नव्यानं उठल्यानं ती स्थगित करण्याचा प्रसंग ओढवला. ‘आयपीएल’नंतर पुन्हा एकदा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळविण्यात आली...

‘आयसीसी’ अध्यक्ष म्हणून जय शहा यांना पहिलं आव्हान पेलावं लागेल ते पाकिस्तानमधील ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’चं. ‘एशियन क्रिकेट कौन्सिल’चे अध्यक्ष या नात्यानं ते ‘हायब्रीड मॉडेल’चे भक्कम पुरस्कर्ते राहिलेत. त्यामुळंच गेल्या वर्षीची ‘आशिया चषक’ स्पर्धा पाकिस्तानबरोबर श्रीलंकेतही रंगली होती. शहा यांची आता पेचातून वाट काढताना कसोटी लागेल. कारण भारत सरकार क्रिकेट संघाला पाकिस्तानला जाण्याची परवानगी देण्याची शक्यता दुरापास्तच...त्याशिवाय आवश्यक निधीची व्यवस्था करून कसोटी क्रिकेटची लोकप्रियता टिकवून ठेवणं, एकदिवसीय सामन्यांचं महत्त्व राखणं आणि जगभरातील ‘टी-20 लीग’कडे खेळाडूंचा मुक्तपणे लोटणारा ओघ रोखणं हेही त्यांच्यासमोरील महत्त्वाचे मुद्दे असतील !

‘इनिंग’ची सुरुवात...

  • 2009 : जय शहा यांचा क्रिकेटच्या प्रशासनात रीतसर प्रवेश झाला...त्यांनी त्यावेळी ‘सेंट्रल बोर्ड ऑफ क्रिकेट, अहमदाबाद’मध्ये (सीबीसीए) काम करण्यास सुऊवात केली होती. त्यानंतर राज्यस्तरावर त्यांनी ‘गुजरात क्रिकेट असोसिएशन’चे अधिकारी म्हणून जबाबदारी पेलली...
  • 2011 : शहा यांचा भारतीय क्रेकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) शिरकाव...त्यांचा समावेश करण्यात आला तो मंडळाच्या मार्केटिंग कमिटीमध्ये. त्यावेळी ते अवघे 25 वर्षांचे...
  • 2013 : गुजरात क्रिकेट संघटनेमध्ये सचिवपदापर्यंत पोहोचलेल्या जय यांनी ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघटनेचं प्रतिनिधीत्व केलं होतं...
  • 2015 : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची उचलबांगडी करण्यात शहा यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी पाठिंबा दिलेले सध्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सचिवपदासाठीच्या निवडणुकीत श्रीनिवासन यांचे उमेदवार संजय पटेल यांना एका मतानं पराभूत केलं...

‘बीसीसीआय’मधील उदय...

  • 2019 : 31 वर्षीय जय शहा यांना सर्वांत मोठी बढती मिळाली ती सचिवपदी. त्यासरशी केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेटच्या विश्वातील सर्वांत शक्तिशाली भूमिका त्यांच्याकडे चालून आली. त्यावेळी सर्व प्रकाशझोत राहिला तो ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी सौरव गांगुली स्थानापन्न होण्यावर. त्यामानानं शहा यांच्या निवडीचा गाजावाजा झाला नाही. प्रशासकांच्या समितीचा कारभार आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलेले तडाखे या पार्श्वभूमीवर गोंधळाच्या कालावधीनंतर ही नवीन राजवट संघटनेत उदयाला आली होती...
  • 2022 : शहा पुन्हा बिनविरोध निवडून आले, तर गांगुलीच्या जागी वर्णी लागली ती रॉजर बिन्नीRची...
  • 2021 : जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या दिशेनं प्रवास सुरू होऊन जय शहा यांची निवड झाली ती ‘एशियन क्रिकेट कौन्सिल’च्या अध्यक्षपदी. ते त्या मंडळाचे देखील सर्वांत तऊण अध्यक्ष ठरले...
  • 2022 : शहा यांच्याकडे चालून आलं ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचं अध्यक्षपद...

पाडला पैशांचा पाऊस...

  • कोव्हिडच्या प्रकोपामुळंच 2020 साली रणजी ट्रॉफीचं आयोजन होऊ शकलं नाही तसंच 2021 मध्ये देशांतर्गत खेळाडूंच्या उत्पन्नावर लक्षणीय परिणाम झाला. याची दखल घेऊन जय शहा यांनी सप्टेंबर, 2021 मध्ये घोषणा केली ती नवीन ‘पेमेंट स्ट्रक्चर’ची. त्यानुसार, कारकिर्दीत 40 हून अधिक सामने खेळलेल्या खेळाडूंना मिळू लागलीय ती प्रतिदिन 60 हजार ऊपये याप्रमाणं ‘मॅच फी’...
  • यंदाच्या सुऊवातीला शहा यांनी अशीच आणखी एक नवीन योजना जाहीर केली. त्याप्रमाणं एका हंगामात खेळल्या गेलेल्या कसोटींच्या संख्येवरून खेळाडूची ‘मॅच फी’ लक्षणीय प्रमाणात वाढेल. त्यामुळं कसोटी सामन्याच्या 15 लाख रुपयांच्या ‘मॅच फी’च्या व्यतिरिक्त जर एखादा खेळाडू एका मोसमातील 75 टक्के सामन्यांत खेळला, तर त्याच्या खात्यात जमा होतील ते प्रत्येक कसोटीमागं अतिरिक्त 45 लाख ऊपये...
  • जय शहा यांनी मोठी भूमिका बजावलीय ती महिला क्रिकेटला चालना देण्यात...प्रदर्शनीय स्पर्धांऐवजी महिला क्रिकेटपटूंसाठी योग्य लीग आयोजित करण्यास अनेक वर्षांपासून होणारा विलंब संपुष्टात आणून त्यांनी 2022 च्या उत्तरार्धात नि 2023 च्या सुऊवातीस प्रत्यक्षात आणली ती ‘आयपीएल’च्या धर्तीवरील ‘महिला प्रीमियर लीग’. या स्पर्धेनं संघाची मालकी अन् मीडिया हक्कांपासून खेळाडूंना मिळणाऱ्या पैशांपर्यंत महिला क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडण्यास पहिल्या वर्षापासूनच सुरुवात केलीय...‘महिला प्रीमियर लीग’चं दोन वर्षांपासून दणक्यात आयोजन झालंय...
  • 2022 च्या अखेरीस त्यांनी उचललेलं आणखी एक मोलाचं पाऊल म्हणजे महिला व पुरुष क्रिकेटपटू यांच्या उत्पन्नातील तफावत भरून काढताना महिला खेळाडूंना देखील पुरुषांइतकीच ‘मॅच फी’ मिळेल याची ‘बीसीसीआय’नं केलेली घोषणा...तथापि, यामुळं विद्यमान केंद्रीय करार व्यवस्थेत मात्र बदल झालेला नाहीये...
  • ‘बीसीसीआय’मधील शहा यांच्या कार्यकाळातच पाच वर्षांच्या ‘आयपीएल मीडिया हक्कां’साठी 48 हजार 390 कोटी ऊपयांचा विक्रमी करार झाला अन् ‘आयपीएल’ अमेरिकेच्या ‘नॅशनल फुटबॉल लीग’च्या मागोमाग (प्रति सामना मूल्याचा विचार करता) दुसरी सर्वांत मौल्यवान क्रीडा लीग बनली...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :

.