For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयसीसी अध्यक्षपदासाठी जय शाह प्रबळ दावेदार

06:58 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयसीसी अध्यक्षपदासाठी  जय शाह प्रबळ दावेदार
Advertisement

विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांची माघार :इंग्लंड, ऑस्ट्रेलियन मंडळाचा शाह यांना पाठिंबा  

Advertisement

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहा दिवसांचा कालावधी

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी समाप्त होत आहे.बार्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी नकार दर्शवला आहे. यातच आयसीसीचे पुढील अध्यक्ष म्हणून जय शाह यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. जय शाह आयसीसीचे नवे संचालक होऊ शकतात. त्यांना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या बोर्डानेही पाठिंबा दिला आहे. आयसीसी संचालक पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट आहे.

ग्रेग बार्कले हे नोव्हेंबर 2020 मध्ये प्रथम या पदावर निवडून आल्यानंतर 2022 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी या पदाचे सूत्रे स्वीकारली होती. न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले लवकरच अध्यक्ष म्हणून चार वर्षे पूर्ण करतील आणि त्यांचा सध्याचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट आहे. यामुळे आगामी 6 ते 7 दिवसांत आयसीसीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याकडे क्रिकेटवर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बार्कले यांनी बोर्डाला कळवले आहे की ते तिसऱ्या टर्मसाठी उभे राहणार नाहीत आणि नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांचा सध्याचा कार्यकाळ संपल्यावर ते पद सोडतील, असे आयसीसीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा पाठिंबा

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने जय शाह यांना किमान 3 वर्षांसाठी आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे. यातच बार्कले यांनी माघार घेतल्यामुळे जय शाह यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.

अध्यक्षपदासाठीची नियमावली

आयसीसीच्या नियमानुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 16 मते आहेत आणि आता विजेत्यासाठी नऊ मतांचे बहुमत आवश्यक आहे. 27 ऑगस्ट 2024 पर्यंत पुढील अध्यक्ष पदासाठी अर्ज सादर करावे लागतील आणि जर एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर निवडणूक होईल आणि नवीन अध्यक्षांचा कार्यकाळ 1 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल. विशेष म्हणजे, शाह सध्या आयसीसीच्या वित्त उप समितीचे प्रमुख आहेत. मतदान करणाऱ्या 16 पैकी बहुतांश सदस्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. यातच इंग्लंड व ऑस्ट्रेलियन मंडळाने त्यांना पाठिंबा दिला असल्यामुळे शाह यांचे पारडे जड मानले जात आहे.

शाह अध्यक्ष झाल्यास नवा विक्रम

जर शाह यांची आयसीसी अध्यक्षपदासाठी निवड झाली तर वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी ते सर्वात तरुण आयसीसी अध्यक्ष बनून इतिहास रचू शकतात. यापूर्वी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या चार भारतीयांनी आयसीसीचे नेतृत्त्व केले आहे.

Advertisement
Tags :

.