For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदगा येथे गुऱ्हाळ हंगामाला सुरुवात

10:48 AM Nov 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोदगा येथे गुऱ्हाळ हंगामाला सुरुवात
Advertisement

पूर्वभागातील नवीन ऊचकर गूळ बेळगाव बाजारपेठेत दाखल : मजुरांची कमतरता, कारखान्यांकडे ऊस पाठविण्याच्या ओढीमुळे गुऱ्हाळघरांवर संकट

Advertisement

युवराज पाटील /सांबरा

मोदगा (ता. बेळगाव) येथे गुऱ्हाळ हंगामाला सुरुवात झाली असून पूर्व भागातील नवीन रुचकर गूळ बेळगाव बाजारपेठेत दाखल झाला आहे तालुक्याच्या पूर्वभागात दरवर्षी गुऱ्हाळघरे चालविली जातात. ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या प्रारंभी गुऱ्हाळघरांना प्रारंभ केला जातो. मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, माविनकट्टी, पंत बाळेकुंद्री, मोदगा, सुळेभावी गावांमध्ये गुऱ्हाळघरे चालवली जातात. यंदा सर्वप्रथम मोदगा या ठिकाणी गुऱ्हाळघरांना प्रारंभ झाला आहे. यंदा सततच्या पावसामुळे उसाची म्हणावी तशी वाढ झाली नसली तरी ऊसपीक चांगले आले आहे. पूर्वभागामध्ये किमान सहा महिने गुऱ्हाळ हंगाम चालतो. यादरम्यान चाऱ्याचा प्रश्न मिटतो. आजूबाजूच्या खेड्यातील शेतकरी वर्ग दररोज ऊसतोडणीसाठी शेतामध्ये हजर असतात. उसाचा वरील भाग हा जनावरांना चारा म्हणून वापरला जातो.

Advertisement

गुऱ्हाळघरांना घरघर

एका गुऱ्हाळघरात ऊस तोडणीपासून ते गूळ तयार करण्यापर्यंत किमान 16 ते 18 मजुरांची गरज असते. त्यामुळे गुऱ्हाळ हंगामात रोजगाराचाही प्रश्न मिटतो. मात्र हे काम करण्यासाठी सहसा मजूर मिळत नसल्याने परगावाहून आणावे लागतात. अलीकडच्या काळामध्ये पूर्वभागातील गुऱ्हाळघरांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे गुऱ्हाळ व्यावसायिकांना हा एक चिंतेचा विषय बनला आहे. बेळगाव जिह्यामध्ये गुऱ्हाळघरांना घरघर लागली असताना पूर्वभागामध्ये मात्र गुऱ्हाळ व्यावसायिकांनी आपला वडिलोपार्जित व्यवसाय जपून ठेवला आहे. मात्र मजुरांची कमतरता व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर कारखान्याकडे असलेली ओढ यामुळे गुऱ्हाळघरे चालविणे कठीण बनले आहे. पूर्वी पूर्वभागामध्ये 50 हून अधिक गुऱ्हाळघरे चालवली जात होती. अलीकडच्या काळात ही गुऱ्हाळघरांची संख्या घटत चालली असून वीसवर येऊन पोहोचली आहे. सध्या मोदगा येथे गुऱ्हाळघरांना प्रारंभ झाला असून काही दिवसांमध्ये सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, सुळेभावी आदी ठिकाणीही गुऱ्हाळघरे सुरू करण्यासाठी तयारी चालली आहे. गुऱ्हाळघर परिसराची स्वच्छता करणे, इंजिन बसविणे, मंडप उभारणे, चिपाडाची व्यवस्था करणे, ट्रॅक्टर व मजूर जमविणे आदी कामांमध्ये गुऱ्हाळ व्यावसायिक गुंतले आहेत.

मोदगा येथील गुळाला चांगला दर

मोदगा येथील रुचकर गूळ बेळगाव बाजारपेठेतील रविवारपेठ येथे दाखल झाले असून गुळाला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याचे गुऱ्हाळ व्यावसायिक शिवाजी रामने यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.