चार तास चालणारे गुळ सौदे दोन तासात पूर्ण
कोल्हापूर बाजार समितीमधील चित्र : हंगामाच्या सुरुवातीलाच रव्यांची आवक निम्म्याने घटली: अपेक्षित दर नसल्याने गुळ:उत्पादकांचा व्यवसायातून काढता पाया: जिल्ह्यात केवळ 70 गुऱ्हाळ घरेच सुरु
कोल्हापूर/ धीरज बरगे
जिल्ह्यातील गुळ व्यवसायाचा आलेख प्रत्येक हंगामात घसरतच निघाला आहे. कोल्हापूर बाजार समितीमध्ये यापुर्वी चार-चार तास चालणारे गुळ सौदे यंदाच्या हंगामात केवळ दोन तासातचं उरकत आहेत. दैनंदिन गुळ रव्यांची आवक निम्म्याने घटली आहे. बाजार समितीकडे सुमारे 130 गुऱ्हाळ घरांची नोंद झाली असली तरी जिल्ह्यात प्रत्यक्षात केवळ 70 गुऱ्हाळ घरेच सुरु आहेत. गुळ उत्पादन व्यवसायासमोरील आव्हाने अशीच कायम राहिल्यास पुढील काळात सांगली बाजार समितीप्रमाणे कोल्हापूर बाजार समितीमधील गुळाची उलढाल पूर्णपणे ठप्प होण्याची भिती गुळ उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
गुऱ्हाळ घरांचा जिल्हा अशी कोल्हापूरची ओळख आहे. येथील शेतकऱ्यांकडून उत्पादीत केल्या जाणाऱ्या दर्जेदार गुळाने कोल्हापूरची ओळख देशभर पोहचवली. जिल्ह्यात एकेकाळी सुमारे 1200 गुऱ्हाळ घरे सुरु होती. मात्र साखर कारखान्यांकडून ऊसाला चांगला दर मिळू लागल्यानंतर गुऱ्हाळ घरांसमोर अनेक आव्हाने उभा राहू लागली. गुळ व्यवसाय तोट्याचा ठरू लागल्याने अनेक शेतकरी या व्यवसायामधून बाहेर पडू लागले. सद्यस्थितीत एकूण गुऱ्हाळ घरांपैकी केवळ दहा टक्क्यांहून कमी गुऱ्हाळ घरे सुरु आहेत.
दोन-तीन तासातंच पूर्ण होतात सौदे
बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामात गुळ सैदे दोन तासातंच पूर्ण होत आहेत. यापुर्वी एक रव्यांचे सौदे सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालायचे. पण सध्या ते सकाळी 11 वाजेपर्यंतच पूर्ण होत आहेत. तसेच सकाळी साडेनऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत चालणारे पाच व दहा किलो गुळ रव्यांचे सौदेही सकाळी अकरा वाजता संपत असल्याचे चित्र बाजार समितीमध्ये आहे.
एक किलो रव्यांची आवक निम्म्याने घटली
बाजार समितीमध्ये एक किलो रव्यांची 80 ते 90 गाडी दैनंदिन आवक होती. ती आत्ता 30 ते 35 गाड्यांवर आली आहे. त्यामुळे एक किलो रव्यांची आवकमध्ये मोठयाप्रमाणात घट झाली आहे.
सौद्यासाठीची प्रतिक्षाच संपली
गुळ सौद्यांसाठी गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी समितीमधील व्यापऱ्यांकडे नोंद केल्यानंतर सौद्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना सुमारे तीन दिवस प्रतिक्षा करावी लागत होती. यंदाच्या हंगामात गुऱ्हाळ घरे अत्यल्प प्रमाणात सुरु असल्याने सौद्यासाठीची प्रतिक्षाच संपली असल्याचे गुळ उत्पादक सांगत आहेत.
सांगलीत गुळाची आवक ठप्प
कोल्हापुराच्या बरोबरीने सांगली बाजार समितीमध्येही गुळाची आवक होत होती. यंदा मात्र येथील गुळ उत्पादन व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. त्यामुळे सांगली बाजार समितीमध्ये गुळाची आवक पूर्णपणे ठप्प झाली आहे. भविष्यात कोल्हापूर बाजार समितीमध्येही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. येथील गुळ व्यवसाय सुरु राहण्यासाठी सरकार, बाजार समितीने वेळीच उपायोजना करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
गतहंगामाच्या तुलनेत यंदा दर अधिक
गतहंगामात गुळाला अपेक्षित दर न मिळाल्याने गतहंगामाच्या तुलनेत यंदा निम्मिच गुऱ्हाळ घरे सुरु झाली आहेत. गत हंगामात गुळाला प्रतिक्विंटल 3500 ते 4000 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. यंदाच्या हंगामात तुलनेने अधिक दर मिळत आहे. सध्या 4500 ते 5000 हजार रुपयांपर्यंत दर मिळत असला तरी पुढील काळात इतकाच दर मिळण्याची शाश्वती उत्पदकांना नाही. त्यामुळे गतहंगामातील सुमारे 150 गुळ उत्पादक शेतकऱ्यांपैकी केवळ 60 ते 70 शेतकऱ्यांनीच गुऱ्हाळ घरे सुरु केली आहेत. तर इतक्याच गुळ उत्पादकांनी यंदा गुळ व्यवसायाला राम राम केला आहे.