For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भव्य मिरवणुकीने जगदीश शेट्टर यांचा अर्ज दाखल

01:27 PM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
भव्य मिरवणुकीने जगदीश शेट्टर यांचा अर्ज दाखल
Advertisement

हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी : विविध वाद्यांचा गजर, रखरखत्या उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, मान्यवरांची उपस्थिती

Advertisement

बेळगाव : भाजपचे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. भगवे फेटे, भगवे झेंडे, ढोलताशा, धनगरी ढोल, तुतारी या वाद्यांच्या निनादात भाजपची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गोवा व कर्नाटकातील भाजपचे मंत्री व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून जगदीश शेट्टर यांनी अर्ज दाखल केला. समादेवी गल्ली येथील समादेवीचे दर्शन घेऊन जगदीश शेट्टर यांनी मिरवणुकीला सुरुवात केली. सोमवार दि. 15 रोजी त्यांनी अर्ज दाखल केला असला तरी रामनवमीचे औचित्य साधून शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कर्नाटकातील भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ झाला. रखरखत्या उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून होता.

समादेवी गल्ली येथून सुरू झालेली मिरवणूक गणपत गल्ली कॉर्नर मार्गे काकतीवेस तेथून राणी चन्नम्मा चौक व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली. लोकसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. डोक्यावर भगवे फेटे, गळ्यामध्ये भाजपची शाल घातलेले कार्यकर्ते शहरात जागोजागी दिसून येत होते. यामध्ये महिलांचा समावेश सर्वाधिक होता. यावेळी खासदार मंगला अंगडी, कर्नाटकचे दिल्ली येथील माजी विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील, विधान परिषद सदस्य हनुमंत निराणी, आमदार भालचंद्र जारकीहोळी, भाजपचे राज्य व उपाध्यक्ष अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, भाजप नेते किरण जाधव, मुरगेंद्रगौडा पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. बेळगावमध्ये झालेल्या भाजपच्या शक्तिप्रदर्शनाने विजय निश्चित असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्यानंतर कर्नाटकातही लवकरच डबल इंजीन सरकार स्थापले जाणार आहे. याची सुरुवात मतदारांनी बेळगावपासून करावी व जगदीश शेट्टर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

Advertisement

चन्नम्मा चौक येथे जल्लोषात स्वागत

जगदीश शेट्टर तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे राणी चन्नम्मा चौक येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. 20 फूट उंचीचा फुलांचा हार घालून कार्यकर्त्यांनी स्वागत केले. भारावून गेलेल्या जगदीश शेट्टर यांनी कार्यकर्त्यांच्या या प्रेमामुळे आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला.

शेट्टर दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील : येडियुराप्पा, राज्यातील सर्वच जागा जिंकण्यासाठी प्रयत्नशील

राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्यासाठी भाजपला अनुकूल वातावरण आहे. भाजपनेही सर्व ताकद पणाला लावून काम सुरू केले आहे. बेळगावमध्ये जगदीश शेट्टर तब्बल दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी व्यक्त केला. बुधवारी जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी येडियुराप्पा बेळगावात आले होते. यावेळी त्यांनी बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. भाजप हा पक्ष हिंदू-मुस्लीम फूट पाडणारा नसून सर्व जाती-धर्मिंना एकत्रितरित्या घेऊन जाणारा पक्ष आहे. परंतु, विरोधकांकडून हिंदू-मुस्लीम यामध्ये भेद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, भाजप अशा जातीयवादी शक्तींना थारा न देता अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करेल, असे येडियुराप्पा यांनी सांगितले. भाजपचे जुने खासदार पक्ष सोडत असल्याबाबत येडियुराप्पा यांना छेडले असता खासदार करडी संगण्णा हे काँग्रेसमध्ये जाण्याचे स्वाभाविक होते. परंतु, राज्यात भाजप वाढविण्यासाठी आमचे अधिकाधिक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच भाजप सोडून गेलेल्या नेते, कार्यकर्त्यांना पुन्हा भाजपमध्ये आणले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.