For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगदीप धनखड यांचे त्यागपत्र संमत

06:59 AM Jul 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
जगदीप धनखड यांचे त्यागपत्र संमत
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दिलेले त्यागपत्र संमत करण्यात आले आहे, अशी घोषणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यालयाने केली आहे. सोमवारी धनखड यांनी ढासळत्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यागपत्र सादर केले होते. केंद्रीय गृहविभागाने ते नोंद करुन घेतले असून तशा प्रकारची अधिसूचना प्रसारित केली आहे. त्यामुळे आता उपराष्ट्रपतीपद आणि राज्यसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले असून नवे नेते निवडावे लागणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगदीप धनखड यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. जगदीप धनखड यांनी विविध पदांवर कार्यरत राहून देशाची सेवा केली आहे. प्रत्येक पदाला त्यांनी आपल्या कष्टाने आणि कामगिरीने न्याय दिला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या त्यांच्या कार्यकालात त्यांनी त्यांच्या निर्णयशक्तीचा आणि कणखरपणाचा प्रत्यय आणून दिला. त्यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

Advertisement

सोमवारी त्यागपत्र

जगदीप धनखड यांनी सोमवारी रात्री उशीरा अचानकपणे आपल्या पदांच्या त्याग करत असल्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यांच्या या निर्णयाची अनेक कारणे आता चर्चिली जात आहेत. गेल्या महिन्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात ते सहभागी झाले असताना, त्यांची प्रकृती अचानकपणे ढासळल्याने त्यांना कार्यक्रम अर्धवट सोडला लागला होता. काही काळ ते रुग्णालयातही होते. तेव्हापासूनच त्यांच्या प्रकृतीविषयी चर्चा होत होती.

न्यायव्यवस्थेशी वाद

जगदीप धनखड यांच्या काही विधानांमुळे न्यायव्यवस्थेशी त्यांचा वाद झाल्याची चर्चा होती. संसदच सर्वश्रेष्ठ असून राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे अधिकार घटनेने सुनिश्चित केले आहेत. न्यायव्यवस्था त्यांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करुन ते सिमीत करु शकत नाही, अशा अर्थाची विधाने त्यांनी केली होती. राष्ट्रपतींनी एका विशिष्ट कालमर्यादेत राज्य सरकारांनी विधानसभांमध्ये संमत केलेल्या विधेयकांवर निर्णय घ्यावा. तसे न केल्यास ही विधेयके संमत झाल्याचे गृहित धरले जाईल, असा निर्णय न्या. परदीवाला यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने तामिळनाडूच्या संदर्भात दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयासंबंधी धनखड यांनी ही टिप्पणी केली होती. परिणामत: न्यायव्यवस्था आणि संसद यांच्यात वाद निर्माण झाला आहे काय, असे वातावरण निर्माण झाले होते. या विधानांमुळे त्यांना त्यागपत्र द्यावे  लागले असावे, अशी मांडणी काहीजणांकडून केली जात आहे. तथापि, स्वत: जगदीप धनखड यांनी मात्र, आपण केवळ प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव पदत्याग करीत आहोत, अशी स्पष्टोक्ती केलेली आहे.

परिणाम काय होणार...

जगदीप धनखड यांच्या पदत्यागामुळे न्या. यशवंत वर्मा यांच्या विरोधात प्रारंभ करण्यात आलेल्या महाभियोग कार्यवाहीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच आता या पदासाठी नव्या नेत्याची निवड करावी लागणार आहे. सध्या संसदेचे वर्षाकालीन अधिवेशन होत आहे. त्यामुळे या अधिवेशनाचा ऊर्वरित काळ आता राज्यसभा अध्यक्षपदाचे उत्तरदायित्व राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंग यांना सांभाळावे लागणार आहे. त्यांचे अधिकार अध्यक्षांप्रमाणेच असतील.

उपराष्ट्रपतींची निवड कशी होते...

उपराष्ट्रपतींची निवड लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य प्रत्येक एक मत टाकून करतात. सध्या लोकसभेत आणि राज्यसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत आहे. त्यामुळे याच आघाडीमधून नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणार, हे निश्चित आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे जे नवे उपराष्ट्रपती निवडले जातील, ते राज्यसभेचे अध्यक्ष होणार आहेत.

Advertisement
Tags :

.