पाकिस्तानातील जाफर एक्स्प्रेस मोहीम पूर्ण
सरकारचा दावा : बलुच बंडखोरांकडून 21 प्रवाशांची हत्या : सर्व 33 अपहरणकर्त्यांचा खात्मा
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
जाफर एक्स्प्रेसचे अपहरण करुन पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवलेल्या बलोच लिबरेशन आर्मी या संघटनेने पाकिस्तान सरकारला 24 तासांचा अंतिम कालावधी दिला होता. मात्र, तत्पूर्वी पाकिस्तानी लष्कराने राबविलेल्या बचाव मोहिमेत सर्व 33 बलोच बंडखोरांचा खात्मा करण्यात आला. बलोच बंडखोरांनी गेल्या दोन दिवसात 21 प्रवाशांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले असून ही मोहीम फत्ते झाल्याचा दावा पाकिस्तान सरकारकडून करण्यात आला आहे.
जाफर एक्स्प्रेसचे अपहरण केल्यानंतर बलोच बंडखोरांनी सर्व बंदी बंडखोरांना सोडण्याची मागणी केली होती. बंडखोरांना न सोडल्यास सर्व ओलीस सैनिक ठार केले जातील, असा इशारा बंडखोरांनी दिल्यामुळे पाकिस्तानच्या प्रशासनाची कोंडी झाल्याचे दिसून येत होते. मात्र, बुधवारी रात्री अपहरणकर्त्यांना अद्दल घडवत ही मोहीम फत्ते केल्याची घोषणा करण्यात आली.
बलोच लिबरेशन आर्मीकडून मंगळवार अपहरण झालेल्या जाफर एक्स्पे्रसमधील 190 ओलिसांची सुटका करण्यात आली आहे, असा दावा पाकिस्तानी प्रशासनाने केला आहे. बलोच बंडखोरांविरुद्ध पाकिस्तानी सेनेने सर्व बळाचा उपयोग करून प्रतिकारवाईला प्रारंभ केला आहे. सेनेच्या कारवाईत 33 बंडखोर मारले गेल्याचेही प्रतिपादन करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी रात्रीपर्यंत सुरूच होती. तथापि, बलोच लिबरेशन आर्मीने हे दावे अतिरंजित आहेत, असा आरोप केला आहे.
पाकिस्तानचे 30 सैनिक ठार
मंगळवारी बलोच लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेने जाफर एक्स्पे्रसचे अपहरण केले होते. ही रेल्वेगाडी बोगद्यात आल्यानंतर तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. तसेच हल्ल्याच्या आधी पुढचे रेल्वेमार्ग आधीच उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्यामुळे रेल्वे थांबवावी लागली होती. या रेल्वेगाडीतून पाकिस्तानचे दीडशेहून अधिक सैनिक आणि अनेक पोलीसही प्रवास करीत होते. सैनिकांपैकी अनेकांचे अपहरण करण्यात आले असून 30 सैनिकांना प्राण गमवावे लागले होते.
अनेक सैनिकांचे अपहरण
पाकिस्तानच्या कारवाईत अनेक बंडखोर ठार झाले असले तरी अनेकांनी पळून जाण्यात यश मिळविले असून ते आपल्यासमवेत अनेक ओलिसांना घेऊन गेले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. ओलिसांमध्ये अनेक सैनिक आणि पोलीस असण्याचीही शक्यता आहे, अशी माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे ही कारवाई संपण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.
मंगळवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ
मंगळवारी मध्यरात्रीपासूनच पाकिस्तानने बंडखोरांच्या विरोधात कारवाई करण्यास प्रारंभ केला होता. अनेक बंडखोर रेल्वे बोगद्यात सोडून आणि अनेक सैनिकांना पकडून नेऊन सुरक्षित स्थानी गेले होते. पाकिस्तानी सैनिकांनी रेल्वेला वेढा घालून काही ओलिसांची सुटका केली. तसेच पळून जाणाऱ्या काही बंडखोरांना त्यांनी गोळ्या घालून ठार केले. मात्र नेमके किती ओलीस अद्यापही बंडखोरांच्या ताब्यात आहेत, याची स्पष्ट माहिती नसल्याने पाकिस्तान प्रशासन चिंतेत आहे.
किती प्रवासी होते...
अपहरण केलेल्या रेल्वेत नेमके किती प्रवासी होते, यासंबंधी अद्यापही संभ्रम आहे. काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रवाशांची संख्या 400 होती. मात्र, ती 500 किंवा 600 ही असू शकते असेही बोलले जात आहे. त्यामुळे परिस्थिती अद्यापही अनिश्चित असल्याचे दिसून येते. बंडखोरांनी किमान 100 सैनिक आपल्या ताब्यात ठेवले असण्याची शक्यता आहे, असेही बोलले जात आहे.
आत्मघातकी बंडखोर
रेल्वेतील अनेक प्रवाशांना बंडखोरांनी वेढा दिला असून या बंडखोरांच्या शरीरावर स्फोटके आहेत. त्यांच्यावर थेट हल्ला केल्यास या स्फोटकांचा स्फोट होऊन अनेक निरपराध प्रवासी ठार होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्याचा ठपका पाकिस्तान प्रशासनावर येऊ शकतो. म्हणून सैनिकांना कारवाई करताना सावधानता बाळगण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.
बंडखोरांच्या मागण्या
हे अपहरण का करण्यात आले, यावर आता पाकिस्तानातील राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे. पाकिस्तान सरकारने बलुचिस्तानातील जनतेवर अनन्वित अत्याचार केले असून त्यांच्या साधनसंपत्तीचे शोषण केले आहे. यामुळे या प्रांतातील जनता संतप्त झाली असून ती पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मागत आहे. हीच बंडखोर गटांची महत्वाची मागणी आहे. तसेच पाकिस्ताने ज्या बलुची बंडखोरांना अटक केली आहे, त्या सर्वांची सुटका करावी ही बलोच लिबरेशन आर्मीची तत्कालीन मागणी आहे, अशी माहिती या संघटनेच्या प्रवक्त्याने दिली आहे.