For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जडेजाचे शतक, बुमराहचा विश्वविक्रम!

07:30 AM Jul 03, 2022 IST | Tarun Bharat Portal
जडेजाचे शतक  बुमराहचा विश्वविक्रम
Advertisement

स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात 6 अवांतरसह 35 धावांची आतषबाजी, भारत पहिल्या डावात सर्वबाद 416

Advertisement

वृत्तसंस्था/ बर्मिंगहम

रविंद्र जडेजाचे तडफदार शतक आणि अंतिम टप्प्यात हंगामी कर्णधार जसप्रित बुमराहच्या झटपट फटकेबाजीमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद 416 धावांपर्यंत जोरदार मजल मारली. शुक्रवारी रिषभ पंतने 146 धावांची खेळी साकारल्यानंतर शनिवारी या सामन्याच्या दुसऱया दिवशी रविंद्र जडेजाने देखील धडाकेबाज शतक झळकावले. जसप्रित बुमराहने एकाच षटकात 35 धावा फटकावण्याचा केलेला विश्वविक्रम विशेष लक्षवेधी ठरला. या षटकात बुमराहने 29 धावा केल्या आणि 6 धावा अवांतरच्या रुपाने मिळाल्या.

Advertisement

भारताने शनिवारी 7 बाद 338 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर 84.5 षटकात सर्वबाद 416 धावांची मजल गाठली. कर्णधार बुमराहने अवघ्या 16 चेंडूत नाबाद 31 धावांचा झंझावात साकारला. त्याच्या या वेगवान खेळीत 4 सणसणीत चौकार व 2 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला.

डावातील 84 व्या षटकात बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडला 4, 5 (वाईड), 7 (नोबॉल), 4, 4, 4, 6, 1 अशा धावा चोपल्या. या षटकात एकूण 35 धावा वसूल झाल्या. त्यातील 29 धावा बुमराहच्या खात्यावर राहिल्या तर 6 धावा अवांतर राहिल्या. या षटकात चेंडू अगदी बॅटची कड लागून पार गेला तरी त्याचा वेग स्वीट स्पॉटवरील फटक्याप्रमाणे राहिला.

इंग्लंडतर्फे जेम्स अँडरसन स्टार गोलंदाज ठरला. त्याने 21.5 षटकात 60 धावात 5 बळी घेतले. नवोदित मॅटी पॉट्सने 20 षटकात 105 धावात 2 बळी घेतले. बेन स्टोक्स, रुट व ब्रॉड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

डावाला प्रारंभ झाल्यानंतर जडेजाने आक्रमक पवित्र्यावर भर देत असतानाच स्ट्राईक आपल्याकडे राहील, याची काटेकोर काळजी घेतली. त्याने 83 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर आणखी 21 धावा जोडल्या. जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वीच 2500 पेक्षा अधिक धावा व 242 बळी नोंदवले असून कपिलदेवनंतर भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरु आहे. प्रतिकूल परिस्थिती, सामन्यातील दडपणाची स्थिती आणि समोर अव्वल दर्जाची गोलंदाजी यावर मात करत झळकावलेले जडेजाचे शतक अर्थातच सरस ठरले. पुढील महिन्यात 40 व्या वर्षात पदार्पण करणाऱया अँडरसनने 60 धावात 5 बळी घेतले. मात्र, इंग्लंडने 16 नोबॉलसह दिलेल्या 40 अवांतर धावा त्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱया ठरल्या.

इंग्लंडची खराब सुरुवात

त्यानंतर दुसऱया डावात जसप्रित बुमराहने सलामीवीर ऍलेक्स लीसला अवघ्या 6 धावांवर त्रिफळाचीत करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. पावसाचा व्यत्यय आल्याने उपाहारासाठी निर्धारित वेळेपेक्षा लवकर ब्रेक घेण्यात आला. नंतर अल्प कालावधीसाठी खेळ सुरु झाला. त्यातही इंग्लंडला आणखी एक फलंदाज गमवावा लागला. बुमराहनेच क्राऊलीला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. दिवसअखेर इंग्लंडची 5 बाद 84 अशी खराब स्थिती राहिली.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव ः 84.5 षटकात सर्वबाद 416 (रविंद्र जडेजा 194 चेंडूत 13 चौकारांसह 104, पंत 111 चेंडूत 19 चौकार, 4 षटकारांसह 146, बुमराह 16 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 31, शमी 31 चेंडूत 16. अवांतर 40. अँडरसन 21.5 षटकात 60 धावात 5 बळी, मॅथ्यू पॉट्स 2-105, ब्रॉड, स्टोक्स, रुट प्रत्येकी 1 बळी).

इंग्लंड पहिला डाव ः 27 षटकात 5 बाद 84 (क्राऊली 9, लीस 6, पोप 10. जो रुट 31, बेअरस्टो 47 चेंडूत नाबाद 12, बेन स्टोक्स नाबाद 0, बुमराह 11 षटकात 3-35, शमी व सिराज प्रत्येकी 1 बळी).

भारतीय फलंदाजांची आशियाबाहेर वेगवान शतके

फलंदाज / चेंडू / प्रतिस्पर्धी / वर्ष

सेहवाग / 78 / विंडीज / 2006

अझरुद्दीन / 88 / इंग्लंड / 1990

रिषभ पंत / 89 / इंग्लंड / 2022

स्टुअर्ट ब्रॉड  कसोटीत 550 बळी घेणारा तिसरा जलद गोलंदाज

इंग्लंडचा जलद गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड कसोटी क्रिकेटमध्ये 550 बळी घेणारा तिसरा स्पीडस्टार ठरला. दुसऱया दिवशी ब्रॉडने डावातील 80 व्या षटकात शमीला 16 धावांवर बाद करत हा माईलस्टोन पार गाठला. शमीने चेंडू थर्डमॅनकडे फटकावण्याच्या प्रयत्नात फिरकीपटू जॅक लीचकडे सोपा झेल दिला. कसोटी क्रिकेटमध्ये 550 पेक्षा अधिक बळी घेण्याचा पराक्रम यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा व इंग्लंडचा पेस आयकॉन जेम्स अँडरसन यांनीही गाजवला आहे.

कसोटीत किमान 550 बळी घेणारे स्पीडस्टार

गोलंदाज / संघ / सामने / बळी

जेम्स अँडरसन / इंग्लंड / 172 / 656

ग्लेन मॅकग्रा / ऑस्ट्रेलिया / 124 / 563

स्टुअर्ट ब्रॉड / इंग्लंड / 156 / 550

बुमराहने एका धावेने मोडला लाराचा विक्रम!

भारताचा हंगामी कर्णधार जसप्रित बुमराहने जलद गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात 29 धावा वसूल करत महान फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम अवघ्या एका धावेने मागे टाकला! लाराने 2003-04 मध्ये दक्षिण आफ्रिकन डावखुरा फिरकीपटू रॉबिन पीटरसनच्या एकाच षटकात 28 धावांची आतषबाजी केली होती. लाराने त्या 6 चेंडूंमध्ये 4 चौकार व 2 षटकार फटकावले होते. 18 वर्षे अबाधित राहिलेला हा विक्रम बुमराहने शनिवारी मागे टाकला. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू जॉर्ज बेलीने देखील षटकात 28 धावांचा विक्रम नोंदवला. पण, बाऊन्ड्री काऊन्टच्या निकषावर तो लारापेक्षा मागे आहे.

आश्चर्य म्हणजे उद्घाटनाच्या 2007 टी-20 वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगने याच ब्रॉडच्या गोलंदाजीवर 6 चेंडूत 6 षटकारांचा विश्वविक्रम रचला आहे.

बुमराह बरसत गेला, धावा वसूल होत राहिल्या!

84 व्या षटकात अशी झाली ब्रॉडची धुलाई

83.1 ः मिसटाईम हूक आणि चौकार. (4 धावा)

83.2 ः वाईड चेंडू सीमापार. (5 धावा)

83.2 ः नोबॉलवर उत्तुंग षटकार (7 धावा)

83.2 ः मिडऑनच्या दिशेने चौकार (4 धावा)

83.3 ः फाईन लेगकडे चौकार (4 धावा)

83.4 ः मिडविकेटकडे चौकार (4 धावा)

83.5 ः डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे षटकार (6 धावा)

83.6 ः स्वीप फटक्यावर एकेरी धाव (1 धाव)

कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा

धावा / फलंदाज / गोलंदाज / सामना / ठिकाण / हंगाम

35 / जसप्रित बुमराह / स्टुअर्ट ब्रॉड / भारत वि. इंग्लंड / बर्मिंगहम / 2022

28 / ब्रायन लारा / रॉबिन पीटरसन / विंडीज वि. द. आफ्रिका / जोहान्सबर्ग / 2003-04

28 / गॅरेथ बॅले / जेम्स अँडरसन / ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड / पर्थ / 2013-14

28 / केशव महाराज / जो रुट / द. आफ्रिका वि. इंग्लंड / पोर्ट एलिझाबेथ / 2019-20

27 / शाहिद आफ्रिदी / हरभजन सिंग / पाकिस्तान वि. भारत / लाहोर / 2005-06

26 / क्रेग मॅकमिलन / युनूस खान / न्यूझीलंड वि. पाकिस्तान / हॅमिल्टन /2000-01

26 / ब्रायन लारा / दानिश कनेरिया / विंडीज वि. पाकिस्तान / मुल्तान / 2006-07

26 / मिशेल जॉन्सन / हॅरिस / ऑस्ट्रेलिया वि. द. आफ्रिका / जोहान्सबर्ग / 2008-09

26 / ब्रेन्डॉन मॅक्युलम / लकमल / न्यूझीलंड वि. श्रीलंका / ख्राईस्टचर्च / 2014-15

26 / हार्दिक पंडय़ा / पुष्पकुमारा / भारत वि. श्रीलंका / पल्लेकेले / 2017

Advertisement
Tags :

.