डब्ल्यूटीसी फायनलसाठी जे.श्रीनाथ सामनाधिकारी, मेनन चौथे पंच
वृत्तसंस्था/दुबई
भारताच्या कसोटी संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले नसले तरी भारताचे माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ या अंतिम लढतीसाठी सामनाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. आयसीसीने या कसोटीसाठी पंच व सामनाधिकाऱ्यांची घोषणा केली. याशिवाय भारताच्या नितिन मेनन यांना चौथ्या पंचाची जबाबदारी मिळाली आहे. इंग्लंडचे रिचर्ड इंलिंगवर्थ व न्यूझीलंडचे ख्रिस गॅफनी हे मैदानी पंचांचे काम पाहतील. ऑस्ट्रेलिया हा डब्ल्यूटीचा विद्यमान चॅम्पियन असून प्रथमच अंतिम फेरी गाठलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांचा जेतेपदासाठी मुकाबला होईल. 11 ते 15 जून या कालावधीत ही लढत लॉर्ड्सवर होणार आहे. इंग्लंडच्याच रिचर्ड केटलबरो यांची टीव्ही पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.
त्यांनी याआधी आयसीसीच्या अनेक महत्त्वाच्या सामन्यांत पंचगिरी केली असून त्यात पुरुषांचा वर्ल्ड व चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धांचा समावेश आहे. 2021 मध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या अंतिम लढतीतही त्यांनी हीच भूमिका बजावली होती. नितिन मेनन हे चौथे पंच असतील. 2021 मधील पुरुषांच्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम लढतीत त्यांनी टीव्ही पंच म्हणून काम पाहिले होते. आतापर्यंतच्या तीनही डब्ल्यूटीसी अंतिम लढतीत इलिंगवर्थ यांनी मैदानी पंचांची भूमिका बजावत इतिहास घडविला आहे. भारताने दोनदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण एकदा न्यूझीलंडकडून व एकदा ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. आयसीसी चेअरमन जय शहा यांनी पंच व सामनाधिकाऱ्यांच्या अनुभव व गुणवत्तेचे प्रशंसा केली असून ते अंतिम लढतीत उत्तम परफॉर्मन्स देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.