जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्ट विद्यार्थ्यांचा कलाविष्कार
महाविद्यालयाच्या भिंतीवर कलात्मक-आकर्षक रेखाटली चित्रे : विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक
बेळगाव : शिनोळी येथील जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कला महाविद्यालयाच्या भिंतीवर कलात्मक आणि आकर्षक अशी चित्रे काढून ही इमारत लक्षवेधी केली आहे. यामुळे चंदगड तालुक्याच्या वैभवात निश्चित भर पडली आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची पाहणी करून बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्कूल ऑफ आर्टला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. इतकेच नव्हे तर त्यांना स्नेहभोजनाचा आनंदही दिला. बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समिती बेळगावचे जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्ट हे कलामहाविद्यालय शिनोळी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे आहे. चित्रमहर्षी कै. के. बी. कुलकर्णी सरांच्या प्रेरणेने व डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळून या महाविद्यालयाची स्थापना इ. स. 1986 साली झाली.
या कला महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाचे मान्यताप्राप्त कलाशिक्षण अभ्यासक्रमाचे पदविका अभ्यासक्रम शिकविले जातात. बेळगाव व चंदगड परिसरातील चित्रकलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरनंतर जवळ असणारे हे एकमेव कला महाविद्यालय आहे. दहावीनंतर एक वर्षाचा मूलभूत अभ्यासक्रम व त्यानंतर चार वर्षांचा रेखा व रंगकला (जीडी आर्ट पेंटींग) हा अभ्यासक्रम येथे शिकवला जातो. तसेच बारावीनंतर कला शिक्षक प्रशिक्षण (आर्ट टिचर डिप्लोमा) हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहे. या दोन वर्षांच्या कला शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना रेखा व रंगकला या अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो.
डिसेंबर 24 मध्ये कला महाविद्यालयाच्या इमारतीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दर्जेदार भित्तीचित्रे साकारण्याचा उपक्रम राबविला. बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे सर्व पदाधिकारी, जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्ट शिनोळीचे प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या प्रयत्नातून सर्व भित्तीचित्रे साकारली गेली. महाविद्यालयात भीत्तीचित्रे साकारत असताना कला महाविद्यालय कलात्मकदृष्ट्या कसे सुंदर दिसेल, यासाठी भारतीय कला संस्कृतीतील प्राचीन चित्रे, लोकचित्रकला यांच्यावर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. त्यानुसार या भीत्तीचित्रांमध्ये कला अभ्यासक्रमात शिकवले जाणारे 20 डिझाईन, रचनाचित्रे, गोंड चित्रकला, अजंठा वेरुळ लेण्यांमधील भीत्तीचित्रणे यांसारखे विषय प्रामुख्याने हाताळले गेले आहेत.
या भीत्तीचित्रणाला काही चित्रांविषयी थोडक्यात घेतलेला आढावा-
महाराष्ट्रातील अजंठा व वेरुळ लेणी ही स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. अजंठा येथील एक श्रेष्ठ कलाकृती म्हणून पद्मपाणी बोधीसत्व हे चित्र ओळखले जाते. या चित्रांची हुबेहुब प्रतिकृती महाविद्यालयाच्या भीत्तीचित्रणात समाविष्ट असून अतिशय दर्जेदार व प्रभावी रेखाटन केले आहे. अजंठा येथील चित्रातील डौल व भाव येथील भीत्तीचित्रणात हुबेहुब साकारले गेले आहेत.
भीत्तीचित्रणात आणखी एक विषय आहे तो म्हणजे गोंड कला. हा एक आदिवासी कला प्रकार आहे. जो मध्य भारतातील गोंड या आदिवासी जमातीने विकसित केला आहे. गोंड जमातीचा इतिहास सुमारे 1400 वर्षांचा आहे. गोंड जमातीचे लोक घरांच्या भितींचे सुशोभीकरण करण्यासाठी ही कला वापरतात. यामध्ये विविध प्राणी, पक्षी, झाडे, वेलींचे आकार रेखाटून त्यामध्ये एकत्रितपणे ठिपके व रेषांच्या माध्यमातून चित्रे साकारली जातात. गोंडकलेत प्रामुख्याने निसर्ग तसेच सामाजिक चालीरितींचे चित्रण दिसते. विद्यार्थ्यांकडून हा कला उपक्रम करवून घेण्यासाठी सर्व शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन त्यांना लाभले. कलेची आवड असणाऱ्या सर्वांनी महाविद्यालयास एकदा आवश्यक भेट दिलीच पाहिजे.