For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सारखं कसंतरी होतंय’ निखळ विनोदाने परिपूर्ण

10:46 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘सारखं कसंतरी होतंय’ निखळ विनोदाने परिपूर्ण
Advertisement

प्रेक्षकांना हसवता हसवता कलाकारांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या

Advertisement

बेळगाव : माणसाला सतत भीती वाटत असेल तर ती एकटेपणाची. त्यावर मात करण्यासाठी तो सतत वेगवेगळे प्रयत्न आणि प्रयोग करतो. जागतिकीकरणानंतर ‘आम्ही मायदेशी, मुले परदेशी’ हे चित्र अधिक गडद झाले. भारतात आपल्याला काही झाले आणि आपली मुले सोबत नसतील तर? ही चिंता बहुतांश पालकांना भेडसावते. याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारलेला ‘सारखं कसंतरी होतंय’ हा नाट्याप्रयोग मंगळवारी केएलईच्या आधुनिक अशा शताब्दी सभागृहात झाला. केशव करमरकर हा अत्यंत साधा, सरळ, काहीसा भाबडा माणूस. ईला कानविंदे ही त्याची कॉलेजमधील मैत्रीण. ती आवडत असली तरी तसे सांगण्याचे धाडस केशवमध्ये नसल्याने कालांतराने विक्रांत नावाच्या वर्गमित्राशी तिचे लग्न होते. परंतु आपण फक्त एक वस्तू म्हणून पाहिल्या जात आहोत, याची जाणीव झाल्याक्षणी ईला विक्रांतपासून दूर होते. केशवच्या पत्नीचे अपघाती निधन होते. एकुलती मुलगी शिक्षणासाठी लंडनला जाण्याचे ठरवते आणि आता आपले कसे होणार, या भीतीपोटी केशव ईलाला भेटतो. तिने डॉक्टर असण्याचे नाटक करून, आपण रुग्ण असल्याचे भासवून उपचार करावेत व एनकेनप्रकारे मुलीला थांबण्यास भाग पाडण्याची क्लुप्ती लढवतो. मात्र, केशव आणि ईलाच्या संवादांमधून हे सर्व नाटक असल्याचे मुलीच्या लक्षात येते. परंतु, तीसुद्धा नाटक पुढे नेत राहते. जेव्हा या गोष्टींचा उलगडा होतो, तेव्हा आपण सतत भीतीच्या पडछायेखाली का वावरत राहिलो, याचे स्पष्टीकरण केशव देतो. आणि सर्व किंतू परंतु दूर होऊन या नवीन कुटुंबाचे वर्तुळ पूर्ण होते, ज्यामध्ये अम्मा आणि कंपौंडर यांचाही सहभाग आहे.

विनोदी नाटक सतत हसवणारे हवे ही अपेक्षा हा नाट्याप्रयोग पूर्ण करतो. सहज अभिनय हे प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर या दोघांचेही वैशिष्ट्या होय. त्यांना तितकीच उत्तम साथ पौर्णिमा अहिरे (अम्मा), सिद्धी घैसास (मुलगी) आणि विक्रांत व कंपौंडर (राजसिंह देशमुख) यांनी दिली. अचूक टायमिंग आणि सांघिकता यामुळे या प्रयोगाने प्रेक्षकांना भरभरून हसविले. थंडी, बीपी, मोबाईल, संशयीवृत्ती इथंपासून केशवला सगळ्याचीच भीती वाटते. म्हणूनच त्याला ‘सारखं कसंतरी होतंय’ आणि हेच नाटकाचे शीर्षकही आहे. संकर्षण कऱ्हाडे यांनी अत्यंत खुमासदार शैलीमध्ये या नाटकाचे लेखन केले आहे. खुसखुशीत विनोदांची पेरणी पूर्ण प्रयोगभर आहे. निखळ विनोदाने परिपूर्ण असलेल्या या प्रयोगाने प्रेक्षकांना हसवता हसवता त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या, हेच या नाटकाचे यश होय. उत्तम रंगसंगतीने परिपूर्ण दोन घरांची वैशिष्ट्यापूर्ण रचना असणाऱ्या नेपथ्यामुळे नाटकाला उठाव आला आहे. याचे श्रेय प्रदीप मुळे यांना. गौरी थिएटर निर्मित प्रशांत दामले फॅन प्रस्तुत बेळगावचा हा प्रयोग वेणुग्राम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे झाला. मध्यंतरी केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

Advertisement

अडीच मिनिटात गंभीर गोष्ट सांगायला हवी : प्रशांत दामले

अडीच तास एकच गंभीर गोष्ट सांगत राहणे व अडीच मिनिटात एक गंभीर गोष्ट सांगणे यात खूप फरक आहे. विनोदी नाटक अवघ्या अडीच मिनिटात गोष्ट सांगण्याची किमया करू शकते आणि प्रेक्षकही त्याचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकतात. मात्र, विनोदी नाटक हे खऱ्या अर्थाने विनोदी आणि मिष्किल अंगाने जातानाच महत्त्वाची गोष्ट अडीच मिनिटात त्यातून व्यक्त होणे महत्त्वाचे आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते व नाट्या परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. ‘सारखं कसंतरी होतंय’ नाट्याप्रयोगाच्या निमित्ताने बेळगावला आल्यावेळी तरुण भारतशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले. जितका विनोद निखळ तितके नाटक प्रभावी ठरते. सारखं कसंतरी होतंय हे नाटक त्या अर्थाने यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. 269 प्रयोग झाले असून प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिल्याने नाटकाचा हेतू साध्य झाल्याचेही त्यांनी नमूद केले. रसिकांबद्दल विचारता, बेळगावसह सर्व ठिकाणचे रसिक प्रेक्षक उत्तमच असतात, फक्त त्यांचा खिसा नरम-गरम असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. परिषदेचे अध्यक्ष म्हणून काय योजना आहेत, या प्रश्नावर लेखक निर्माण करणे, त्यांना बळ देणे यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान बेळगावमध्ये एक उत्तम थिएटर निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रत्येक नाट्या निर्मात्याने येथे प्रयोग करायला हवेत, हे आपण मुंबईत जाऊन सांगणार आहोत. प्रभाकर कोरे यांनी थिएटर उभे केले आहे, ते जपण्याची जबाबदारी रसिकांची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रयोगासाठी डॉ. राजेंद्र भांडणकर, ऋषिराज देशपांडे यांचे विशेष सहकार्य लाभले. पुढील महिन्यात ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ हा प्रयोग घेऊन येत असल्याचे प्रशांत दामले यांनी जाहीर केले. डॉ. शिल्पा कोडकणी व डॉ. मनीषा भांडणकर यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement
Tags :

.