नियतीचा खेळच न्यारा !
संपला एकदाचा आशिया कप. या स्पर्धेत भारत जिंकणार हे सांगण्यासाठी कोण्या एका ज्योतिषाची आवश्यकता नव्हती. माझ्या मते हा कप जिंकल्यानंतर सुद्धा भारतीय संघ विजयाची चव चाखू शकणार नाही. कारण त्याला किनार होती ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय संघ पाकिस्तानशी खेळत होता. अर्थात यात दोन मतप्रवाह होते. एकतर पाकिस्तान संघाविरुद्ध खेळू नये. किंबहुना या स्पर्धेवर पूर्णत: बहिष्कार टाकावा. दुसरा मतप्रवाह असा होता की ही काही द्विराष्ट्रीय मालिका नव्हती. तर ही बहुराष्ट्रीय स्पर्धा होती. आणि जिथे पाकिस्तान खेळत आहे तिथे तुम्ही किती काळ बहुराष्ट्रीय स्पर्धेवर बहिष्कार टाकणार? आणि हे फक्त क्रिकेटपुरतंच राहणार आहे की आणखी कुठल्या खेळापुरतं. ताजेच उदाहरण द्यायचे झाले तर याच कालावधीत जागतिक भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा सहभागी झाला होता. तिथे पाकिस्तान खेळाडूही सहभागी झाले होते. त्या स्पर्धेबद्दल जास्त ऊहापोह झाला नाही. कारण आपण सर्वजण क्रिकेटशी भावनिकदृष्ट्या जुळलेलो आहोत. पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये टी-20 वर्ल्ड कपचा कुंभमेळा भारतात आणि श्रीलंकेत होणार आहे. 100ज्ञ् भारत2-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताने भारत पाक द्विपक्षीय क्रिकेट कडे कधीच पाठ वळवली आहे. बहुराष्ट्रीय स्पर्धेत भारताने खेळावं की नाही या वादात मी पडणार नाही. कारण हा निर्णय सर्वस्वी भारत सरकारचा असतो. तो योग्य की अयोग्य यावर बरीच मत-मतांतरं असू शकतात.
असो. एक काळ असा होता की आशियाई संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, गेला बाजार वेस्ट इंडीजलाही भारी पडायचे. परंतु मागील काही वर्षात भारत वगळता (न्यूझीलंडने भारताला दिलेला व्हाईटवॉशचा अपवाद वगळता) बाकीच्या संघांची अवस्था फारच दयनीय आहे. भारत वगळता पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश या संघातील एक दोन खेळाडू वगळता प्रतिभाशाली खेळाडू दाखवा आणि शंभर रुपये मिळवा, असे जर कोणी जाहीर केले तर त्यात नवल ते काय. कधी नव्हे तो यावेळी आशिया कपचा विचका झाला. भलेही 41 वर्षानंतर अंतिम सामन्यात पाक विरुद्ध भारताने विजय मिळवला असेल. त्याला कारण सुमार दर्जाचे संघ आणि प्रेक्षकांनी या स्पर्धेला दाखवलेली पाठ. कधी नव्हे ते भारत-पाक सामन्यादरम्यान रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन झालं. कारण त्याला कारणही तसंच होतं. भारत-पाकिस्तान सामने म्हटले की सोल्ड आऊट हे चित्र नेहमीच बघायला मिळतं. परंतु या आशिया कप स्पर्धेच्या निमित्ताने बॉक्स ऑफिसवर हे सामने पूर्णत: अपयशी ठरले.
या पूर्ण स्पर्धेत भारतासमोर सर्व संघ कोकरू ठरले. पूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने मनाला वाटेल त्यावेळी प्रतिस्पर्धी संघांचा फडशा पाडला. कधी भारतीय फलंदाज विजयाचा ‘अभिषेक’ करायचे. तर कधी मंदगती गोलंदाज विजयासाठी ‘कुलदीपक’ बनायचे. ही सर्व कामगिरी भारतीय क्षेत्ररक्षकांनी हाताला लोणी लावून एक-दोन नव्हे तब्बल 12, 13 झेल सोडत केलेली. नियतीचा खेळ तरी बघा कसा, जिथे भारतीय संघ ग्रुप सामन्याव्यतिरिक्त इतर सामने अप्रत्यक्षरीत्या पाकिस्तानविरुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत असताना नियती मात्र वारंवार पाकिस्तानला भारतासमोर आणत होती. एक-दोन नव्हे तब्बल तीन वेळा भारतीय संघाला पाकिस्तानला सामोरे जावं लागलं. अर्थात तिन्ही वेळा भारताने पाकिस्तानचा ‘करेक्ट’ कार्यक्रम केला आहे हेही तेवढेच खरं. मैदानात आणि युद्धात आम्हीच सर्वश्रेष्ठ, हे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं. तणाव आणि दबाव नेमका कसा झेलावा हे सूर्यकुमार यादवने या मालिकेच्या रूपातून दाखवून दिलं. किंबहुना मागील दोन वर्षात पाकिस्तान आमच्यासाठी तोलामोलाचा प्रतिस्पर्धी नाही हे सूर्यकुमार यादवने ठणकावून सांगितले. नेहमी भारत-पाकिस्तान सामना म्हटला की मी देव पाण्यात ठेवणारा. परंतु यावेळी ग्रुप स्टेजनंतर भारत-पाकिस्तान सामना होऊ नये, यासाठी मी देव पाण्यात ठेवले होते. भारतीय संघाने दिमाखदारपणे आशिया कप जिंकला खरा, परंतु नेहमीच भारत-पाकिस्तान सामन्याला मला पावणारा देव यावेळी मात्र माझ्यावर रुसला एवढं मात्र खरं.!
विजय बागायतकर