इटलीच्या जेनिक सिनेरचे पहिले विम्बल्डन जेतेपद
अल्कारेझची जेतेपदाची हॅट्ट्रीक हुकली, कुडेरमेटोहा-मर्टन्स दुहेरीत अजिंक्य
वृत्तसंस्था / लंडन
2025 च्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात इटलीच्या टॉपसिडेड जेनिक सिनेरने स्पेनच्या विद्यमान विजेत्या कार्लोस अल्कारेझचे सलग तिसऱ्यांदा जेतेपद मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळविले. सिनेरचे विम्बल्डन स्पर्धेतील हे पहिले अजिंक्यपद आहे. व्हेरोनिका कुडेरमेटोहा आणि इलेसी मर्टन्स यांनी महिला दुहेरीचे विजेतेपद पटकाविले.
2025 च्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीमध्ये यावेळी नवे टेनिसपटू विजेते ठरले. महिलांच्या विभागात पोलंडच्या स्वायटेकने अजिंक्यपद मिळविताना अमेरिकेच्या अॅनिसिमोव्हाचा एकतर्फी पराभव केला. पण पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात इटलीच्या टॉपसिडेड जेनिक सिनेरला विजयासाठी अल्कारेझने तब्बल तीन तास झुंजविले. पण सिनेरने आपल्या वेगवान सर्व्हिस तसेच बेसलाईन खाळाच्या जोरावर अल्कारेझला पराभवाची धुळ चारली. सिनेरचे हे चौथ ग्रॅन्डस्लॅम जेतेपद आहे. यापूर्वी त्याने दोनवेळा ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा तर एकदा अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. प्रतिष्ठेच्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत त्याने यावर्षी जेतेपदाचे आपले खाते उघडले.
सिनेरने अंतिम सामन्यात अल्कारेझचा 4-6, 6-4, 6-4, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. अल्कारेझने यापूर्वी म्हणजे 2023 आणि 2024 साली सलग दोनवेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती तर तो यावेळी या स्पर्धेत जेतेपदाची हॅट्ट्रीक साधण्यासाठी सज्ज झाला होता. या अंतिम फेरीतील पहिल्या सेट्मध्ये सिनेरने आपल्या वेगवान सर्व्हिसच्या जोरावर अल्कारेझची सहाव्या गेम्समध्ये सर्व्हिस तोडली. त्यानंतर त्याने ड्रॉप शॉटवर तसेच बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर 4-2 अशी आघाडी अल्कारेझवर घेतली. अल्कारेझने त्यानंतर फोरहॅन्ड फटक्यांचा वेग वाढवित सिनेरला वारंवार नेट जवळ खेचल्याने सिनेरकडून चुका झाल्या आणि अल्कारेझने या सेटमध्ये पिछाडीवरुन 4-4 अशी बरोबरी साधली. अल्कारेझने या सेटमध्ये ताशी 140 कि.मी. वेगाने सर्व्हिस करत होता. सिनेरने यानंतर अल्कारेझने पुढील सलग दोन गेम्स जिंकून हा सेट 6-4 असा जिंकून सिनेवर एका सेटची आघाडी मिळविली.
दुसऱ्या सेट्मध्ये सिनेरने आपल्या डावपेचात खूपच बदल केले. या सेटमध्ये अल्कारेझ आपली सर्व्हिस राखण्यासाठी झगडत होता. दुसऱ्या सेटमधील पहिल्याच गेममध्ये अल्कारेझने तीन पैकी दोन मॅच पॉईंटस् वाचविले. पण सिनेरने हा पहिला गेम आणि त्यानंतर सलग दुसरा गेम जिपूंन 2-0 अशी आघाडी अल्कारेझवर घेतली. अल्कारेझला आपल्या फटक्यावर नियंत्रण राखता न आल्याने त्याच्याकडून वारंवार अनियंत्रीत चूका झाल्या. सिनेरने 4-2 अशी आघाडी अल्कारेझवर घेत अखेर शेवटचे दोन गेम्स जिंकून हा सेट 6-4 असा घेत अल्कारेझची बरोबरी केली. तिसऱ्या सेटमध्ये सिनेरचा खेळ अल्कारेझच्या तुलनेत अधिकच अचूक आणि दर्जेदार झाला. या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी 4-4 अशी बरोबरी साधली होती. पण शेवटच्या दोन गेम्समध्ये सिनेरने अल्कारेझला वारंवार चुका करण्यास भाग पाडले. त्याच्याकडून दुहेरी चुकांची नोंद अनेकवेळा झाल्याने शेवटी सिनेरने हा तिसरा सेट 6-4 असा जिंकून अल्कारेझवर एका सेटची आघाडी मिळविली. चौथ्या सेटमध्ये अल्कारेझवर चांगलेच दडपण आल्याचे जाणवले. मानसिक दडपणाखाली खेळताना अल्कारेझने आपल्या सर्व्हिस दोनवेळा गमविली. या सेटमध्ये सिनेरने अल्कारेझवर 5-3 अशी आघाडी घेतली. त्यानंतर शेवटच्या गेममध्ये सिनेरने फोरहॅन्ड फटक्यावर हा शेवटचा सेट 6-4 असा जिंकून विम्बल्डन चषकावर आपले नाव पहिल्यांदाच कोरले.
व्हेरोनिका-इलेसी विजेते
महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात आठव्या मानांकित व्हेरोनिका कुडेरमेटोव्हा आणि इलेसी मर्टन्स यांनी हेस वेई आणि जेलेना ओस्टापेंको यांचा पराभव करत विजेतेपद पटकाविले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात कुडेरमेटोव्हा आणि मर्टन्स यांनी वेई व ओस्टापेंको यांचा 3-6, 6-2, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या अंतिम लढतीत पहिल्या सेटमध्ये कुडेरमेटोव्हाने 3-1 अशी आघाडी मिळविली. सलग पाच गेम्स जिंकले. त्यानंतर चौथ्या मानांकित वेई आणि ऑस्टापेंको या जोडीने सलग पाच गेम्स् जिंकून हा पहिला सेट 6-3 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये 28 वर्षीय रशियाच्या कुडेरमेटोव्हाने दोनवेळा वेई आणि ओस्टापेंको या जोडीची सर्व्हिस भेदली तसेच त्यांनी तीन ब्रेक पॉईंटस वाचवित हा सेट 6-2 असा जिंकून बरोबरी साधली. शेवटच्या सेटमध्ये व्हेरोनिका आणि इलेसी या जोडीने बेसलाईन खेळावर अधिक भर देत 5-4 अशी आघाडी घेतली. अखेर शेवटचा गेम फोर हॅन्ड फटक्यावर जिंकून महिला दुहेरीच्या अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केला. हेस वेईने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत सातवेळा महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळविले असून त्यापैकी चारवेळा विम्बल्डनमध्ये विजेतीपदे मिळविली आहेत.