इटलीचा जेनिक सिनर विजेता
वृत्तसंस्था / ट्युरीन
द्वितीय मानांकीत इटलीच्या जेनिक सिनरने 2025 च्या टेनिस हंगामाअखेरीस येथे झालेल्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविताना स्पेनच्या टॉपसिडेड अल्कारेझचे आव्हान संपुष्टात आणले. मात्र सिनरला एटीपी मानांकनातील वर्षअखेरीस अग्रस्थान मात्र मिळविता आले नाही.
इटलीच्या सिनरने पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेझचा 7-6 (7-4), 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत चालु वर्षीच्या टेनिस हंगामाअखेरीस शेवटची स्पर्धा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. 2025 च्या टेनिस हंगामात पुरूष विभागात विविध स्पर्धांमध्ये अल्कारेझ आणि सिनर यांच्यातच चुरस जेतेपदासाठी पहावयास मिळाली. चालु वर्षामध्ये या दोन खेळाडूंत आतापर्यंत सहावेळा गाठ पडली. त्यापैकी दोनवेळा सिनरने अल्कारेझवर विजय मिळविला. गेल्या जुलै महिन्यात झालेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत सिनरने अल्कारेझचा पराभव करुन जेतेपद पटकाविले होते. घरच्या शौकिनांसमोर आपल्याला ही प्रतिष्ठेची स्पर्धा पुन्हा एकदा जिंकता आल्याबद्दल सिनरने उपस्थित टेनिस शौकिनांचे आभार मानले आहे.
येथे झालेल्या एटीपी फायनल्स स्पर्धेत मानांकनातील अग्रस्थानांसाठी सिनर आणि अल्कारेझ यांच्यातच खरी चुरस निर्माण झाली होती. पण अल्कारेझने या स्पर्धेत आवश्यक असे सामने जिंकून वर्षअखेरीस एटीपी मानांकनातील अग्रस्थान पटकाविले. त्यामुळे सिनरला ही एटीपी फायनल्स स्पर्धा जिंकूनही मानांकनातील अग्रस्थानापासून वंचित व्हावे लागले. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा वर्षअखेरीस खेळविली जाते. त्यामध्ये मानांकनातील आघाडीचे आठ टेनिसपटू सहभागी होत असतात. आतापर्यंत अल्कारेझ आणि सिनर यांच्यात 16 सामने झाले असून त्यात अल्कारेझने 10 तर सिनरने 6 सामने जिंकले आहेत. चालु वर्षीच्या टेनिस हंगामात सिनर आणि अल्कारेझ यांनी गेल्या तीन ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली होती. फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत अल्कारेझने अंतिम लढतीतील पाचव्या आणि निर्णायक टायब्रेकर सेट्समध्ये सिनरला हरवून विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर या पराभवाची परत फेड सिनरने विम्बल्डन स्पर्धेत केली. पण अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत अल्कारेझने सिनरचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले होते. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत सिनरला अल्कारेझने पराभूत करुन जेतेपद मिळविले होते. तर सिनसिनॅटी खुल्या टेनिस स्पर्धेत अल्कारेझने अजिंक्यपद मिळविले. या स्पर्धेत सिनरला आजारपणामुळे निवृत्त व्हावे लागले होते. सिनरने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत अंतिम सामन्यात जर्मनीचा व्हेरेवचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले होते. 2025 च्या टेनिस हंगामात अल्कारेझ आणि सिनर यांनी प्रत्येकी दोन महत्त्वाच्या ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या. एकूण कामगिरीचा आढावा घेतल्यास चालु वर्षीच्या टेनिस हंगामात अल्कारेझने सहा तर सिनरने 4 प्रमुख स्पर्धा जिंकल्या. ट्युरीनमध्ये झालेल्या स्पर्धेत पुरूष दुहेरीचे जेतेपद हॅरी हेलिओव्हेरा आणि हेन्री पॅटर्न यांनी जिंकताना अंतिम सामन्यात सॅलिसबेरी आणि स्कुपेस्की यांचा 7-5, 6-3 असा फडशा पाडला.