इटलीचा जेनिक सिनेर अजिंक्य
वृत्तसंस्था / ट्यूरीन (इटली)
2024 च्या टेनिस हंगामाअखेर येथे झालेल्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत इटलीच्या टॉपसिडेड जेनिक सिनेरने एकेरीचे जेतेपद मिळविताना अमेरिकेच्या टेलर फ्रिजचा सरळ सेटस्मध्ये पराभव केला.
सदर स्पर्धा मायदेशात झाल्याने सिनेरला शौकिनांचा अधिक प्रतिसाद या सामन्यावेळी लाभला. एकेरीच्या अंतिम सामन्यात 23 वर्षीय सिनेरने फ्रिजचा 6-4, 6-4 अशा सेटसमध्ये पराभव केला. या स्पर्धेच्या 55 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सिनेरच्या रुपात जेतेपद मिळविणारा इटलीचा पहिला टेनिसपटू ठरला आहे. 2024 चा टेनिस हंगाम सिनेरला चांगलाच लाभदायक ठरला आहे. या हंगामाच्या प्रारंभी झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेचे अजिंक्यपद सिनेरने मिळविले होते. चालु वर्षीच्या टेनिस हंगामातील एटीपी टूरवरील हा सिनेरचा 70 वा विजय आहे. एकाच टेनिस हंगामामध्ये ऑस्ट्रेलियन, अमेरिकन आणि निट्टो एटीपी फायनल्स स्पर्धा जिंकणारा जेनिक सिनेर हा तिसरा टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी स्वीसच्या रॉजर फेडररने तसेच सर्बियाच्या जोकोव्हिचने असा पराक्रम केला होता. या अंतिम समान्यात सिनेरने 10 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. आपल्या वेगवान सर्व्हिस आणि बेसलाईन खेळाच्या जोरावर सिनेरने फ्रिजचे आव्हान सरळ सेटस्मध्येच संपुष्टात आणले.