इटलीकडून डेव्हिस चषक जेतेपदाची हॅट्रिक
वृत्तसंस्था / बोलोगेना
2025 च्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत यजमान इटलीने अंतिम लढतीत स्पेनचा 2-0 असा एकतर्फी पराभव करत सलग तिसऱ्यांदा डेव्हिस चषकावर आपले नाव कोरण्याचा नवा इतिहास घडविला. इटलीने डेव्हिस चषक स्पर्धेत जेतेपदाची हॅट्ट्रीक साधली.
इटली आणि स्पेन यांच्यात या स्पर्धेत जेतेपदासाठी ही लढत झाली. या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात इटलीच्या मॅटो बेरेटेनिने स्पेनच्या पाबेलो कॅरेनो बुस्टाचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. तर त्यानंतरच्या दुसऱ्या एकेरी सामन्यात इटलीच्या फ्लेव्हीओ कोबोलीने स्पेनच्या जॉमीमुनारचा 1-6, 7-6 (7-5), 7-5 अशा सेट्समध्ये पराभव करत डेव्हिस चषकावर आपले नाव कारेले. इटलीने पहिले एकेरीचे दोन्ही सामने जिंकल्याने पुरूष दुहेरीचा तिसरा आणि शेवटचा सामना खेळविला गेला नाही.
फिलीपो व्होलांड्रीच्या इटली टेनिस संघाने आतापर्यंत सहावेळा डेव्हिस चषक स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेनला पराभवचा धक्का देत जेतेपदावर शिक्कमोर्तब केला. मात्र या लढतीमध्ये स्पेनला टॉपसिडेड अल्कारेझची उणीव निश्चितच भासली. आतापर्यंत डेव्हिस चषक स्पर्धेच्या इतिहासात स्पेन आणि इटली यांच्यात चारवेळा गाठ पडली. 1976, 2023, 2024 आणि 2025 साली इटलीने डेव्हिस चषक पटकाविला आहे. 1971 मध्ये चॅलेंज राऊंड रद्द केल्यानंतर जेतेपदाची हॅट्ट्रीक साधणारा इटली हा पहिला देश आहे. या स्पर्धेत इटली संघालाही द्वितीय मानांकीत जेनिक सिनरची उणीव चांगलीच भासली. पण त्याच्या गैरहजेरीत बेरेटेनी आणि कोबोली यांनी दर्जेदार कामगिरी करत आपल्या संघाला सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
अंतिम लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात बेरेटेनीने बुस्टाचा सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये बेरेटेनीने बुस्टाची सर्व्हिस भेदत 5-3 अशी आघाडी मिळविली. त्यानंतर त्याने केवळ 30 मिनिटांत हा पहिला सेट 6-3 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये बुस्टाने दर्जेदार सर्व्हिस करत 4-4 अशी बरोबरी साधली. त्यानंतर बेरेटेनीने बेसलाईन खेळावर अधिक भर देत 5-4 अशी आघाडी घेत अखेर हा सेट 6-4 असा जिंकला. या सामन्यात बेरेटेनीने 13 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली.
कोबोली आणि मुनार यांच्यातील दुसरा एकेरी सामना अटीतटीचा झाला. मुनारने वेगवान सर्व्हिसच्या जोरावर पहिला सेट 6-1 असा जिंकून कोबोलीवर आघाडी मिळविली. या सेटमध्ये कोबोलीला केवळ एक गेम जिंकता आला. त्यानंतर उभयतांमधील दुसरा सेट टायब्रेकरपर्यंत लांबला. कोबोलीने वेगवान फटक्याच्या जोरावर हा टायब्रेकर सेट जिंकून मुनाशी बरोबरी साधली. तिसऱ्या आणि शेवटच्या सेट्मध्ये कोबोलीने दोनवेळा मुनारची सर्व्हिस तोडत 6-5 अशी आघाडी मिळविली आणि अखेर हा सेट त्याने 7-5 असा जिंकून मुनारचे आव्हान संपुष्टात आणले.