इटली स्पर्धेबाहेर, स्वित्झर्लंडचा 2-0 ने धक्का
वृत्तसंस्था/ बर्लिन
स्वित्झर्लंडसाठी रेमो फ्र्युलर आणि ऊबेन वर्गास या जोडीने केलेल्या शानदार गोलाच्या जोरावर संघाने गतविजेत्या इटलीला युरो, 2024 च्या उपउपांत्यपूर्व फेरीत 2-0 ने पराभूत केले. या पराभवामुळे लुसियानो स्पॅलेट्टीचा संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे.
स्वित्झर्लंडने चांगल्या प्रकारे बचाव केला असला, तरी, इटालियन्सच्या खराब पासिंग आणि खराब निर्णयक्षमतेने त्यांचे काम सोपे केले. अनेकदा मोक्याच्या ठिकाणी त्यांनी चेंडू सहज प्रतिस्पर्ध्यांना दिला आणि स्पर्धेबाहेर पडण्याच्या मार्गावर असतानाही ते दबाव टाकण्यात अपयशी ठरले. इटालियन संघ पहिल्या सत्रात चेंडूवर ताबा ठेवू शकला नाही आणि अगदी चांगले वाटणारे पासही इटालियन खेळाडूंकडे जाण्याऐवजी स्वित्झर्लंडच्या खेळाडूंकडे जाताना दिसले.
इटालियन्ससाठी एकमेव चांगली बाब स्टीफन एल शारावे याच्या रुपाने राहिली. त्याला 26 व्या मिनिटाला सुवर्णसंधी मिळाली होती, परंतु त्याचा फटका अडविल्याने कॉर्नर दिला गेला. इतके असूनही धक्कादायकपणे त्याला मध्यांतराच्या वेळी बदलण्यात आले. स्वित्झर्लंडने 37 व्या मिनिटाला अप्रतिम गोल करून इटालियन संघाला पाठीमागे ढकलले. पुढील शनिवारी ड्युसेल्डफोर्फ येथे इंग्लंड आणि स्लोव्हाकिया यांच्यातील रविवारच्या लढतीतील विजेत्याशी स्वित्झर्लंडची गाठ पडणार आहे.