इटली अंतिम फेरीत
वृत्तसंस्था / बोलोगेना (इटली)
2025 च्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत कोबोलीच्या शानदार विजयाच्या जोरावर आतापर्यंत दोनवेळा डेव्हिस चषक जिंकणाऱ्या विद्यमान विजेत्या इटलीने उपांत्य लढतीत बेल्जियमचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
या उपांत्य फेरीच्या लढतीत इटलीच्या बेरेटेनीने बेल्जियमच्या राफेल कोलीगनॉनचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत आपल्या संघाच्या विजयाचे खाते उघडले. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात इटलीच्या फ्लेव्हिओ कोबोलीने बेल्जियमच्या बर्जेसवर 6-3, 6-7 (5-7), 7-6 (15-13) अशी मात केली. इटलीने ही लढत 2-0 अशी एकतर्फी जिंकून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पहिले दोन एकेरी सामने ंिजंकल्याने या लढतीत तिसरा दुहेरीचा सामना खेळविण्याची गरज भासली नाही. आता जर्मनी आणि स्पेन यांच्यात उपांत्य फेरीची लढत होणार असून या लढतीतील विजयी संघाबरोबर इटलीचा अंतिम सामना होईल. मात्र उपांत्य लढतीत स्पेनचा टॉपसिडेड कार्लोस अल्कारेझ सहभागी होणार नाही. जर्मनीने अर्जेंटिनावर मात करत उपांत्य फेरी गाठली आहे. तर स्पेनने झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे.
स्पेन आणि झेक प्रजासत्ताक यांच्यातील झालेल्या लढतीत झेक प्रजासत्ताकच्या मेन्सीकने स्पेनच्या बुस्टाचा 7-5, 6-4 असा पराभव केला. त्यानंतर स्पेनच्या मुनारने झेक प्रजासत्ताकच्या लिहेकाचा 6-3, 6-4 असा पराभव करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर महत्त्वाच्या दुहेरीच्या सामन्यात स्पेनच्या ग्रेनोलर्स आणि मार्टिनेस यांनी झेक प्रजासत्ताकच्या मेन्सीक व मॅकेकचा 7-6 (8-6), 7-6 (8-6) असा पराभव केला.