सावंतवाडी मतदारसंघात चुरशीची चौरंगी लढत होणार
महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी ; विशाल परब , अर्चना घारे उमेदवारीवर ठाम
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुती मध्ये व महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख पक्षात बंडखोरी झाली आहे. अपक्ष उमेदवार विशाल परब व अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब या दोन्ही उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली या दोन उमेदवारांसमोर भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, अपक्ष उमेदवार विशाल परब , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या अपक्ष अर्चना घारे परब यांचे आव्हान असून सावंतवाडी मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. आतापर्यंतच्या या मतदारसंघातील इतिहासात दोन अपक्ष तुल्यबळ उमेदवार आणि तुल्यबळ अधिकृत उमेदवार असे एकूण चार उमेदवार अशी चौरंगी लढत होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे. अजून दोन अपक्ष उमेदवार असून एकूण सहा उमेदवार रिंगणात आहेत. महायुती व महाविकास आघाडी चे प्रत्येकी एक एक तर एकूण अपक्ष उमेदवार चार असे एकूण सहा उमेदवार रिंगणात आहेत. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी पक्ष स्तरावरून दबाव वाढवण्यात आला होता .पण जनतेतून आणि युवा वर्गातून वाढता पाठिंबा पाहता अपक्ष उमेदवारी दाखल केलेले विशाल परब यांनी जनतेच्या आग्रहाखातर आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या अर्चना घारे परब यांनाही वाढता पाठिंबा पाहता व कार्यकर्त्यांकडून बळ मिळाल्यामुळे त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही पक्षात बंडखोरी झाली आहे मात्र या बंडखोरीचा फायदा कोणाला होणार ? महाविकास आघाडी की महायुतीला? हे येत्या 23 नोव्हेंबरला कळणार आहे. मात्र, सद्यस्थितीत चारही उमेदवार तुल्यबळ असून चौरंगी लढत रंगतदार होणार असून बाजी कोण मारते याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून आहे.