साहाय्यकानेच केली स्वामीजींची हत्या
म्हैसूरच्या अन्नदानेश्वर मठातील घटना : हत्येनंतर आरोपी मद्यधुंद अवस्थेत मृतदेहाशेजारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
साहाय्यकानेच स्वामीजींची निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी म्हैसूरमधील अन्नदानेश्वर मठात घडली आहे. अन्नदानेश्वर मठाचे शिवानंद स्वामीजी (वय 92) यांची त्यांचा साहाय्यक रवी (वय 60) याने हत्या केली. रवी याने घटनास्थळीच आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याला मद्यधुंद अवस्थेत अटक करून इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हत्येच्या घटनेची माहिती मिळताच म्हैसूरच्या नजाराबाद स्थानकाचे पोलीस, ठसेतज्ञ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. स्वामीजींच्या निकटवर्तीयांकडून माहिती जमा केली जात आहे.
शहाणपणा सांगितल्याने संतप्त झालेल्या रवीने चाकूने हल्ला करून खून केला. त्यानंतर तो विष प्राशन करून मृतदेहाशेजारी बसला होता, अशी माहिती शिवानंद स्वामीजींचा पुतणा लोकेश याने दिली.
आरोपी रवी याची स्वामीजींचा साहाय्यक म्हणून अडीच वर्षांपूर्वी नेमणूक करण्यात आली होती. रवी हा टी. नरसीपूर तालुक्यातील हुक्कलगेरी गावचा रहिवासी आहे. रविवारी पैसे मागितल्याच्या कारणावरून त्याने पत्नीला मारहाण केली होती. त्यामुळे शिवानंद स्वामीजींनी रवीला शहाणपणा सांगितला. सोमवारी सकाळी 9:30 वाजले तरी साहाय्यक स्वामीजींसाठी नाश्ता घेऊन जाण्यासाठी आला नाही. त्यामुळे रवीचे नातेवाईक नाश्ता घेऊन मठात आले, तेव्हा स्वामीजींच्या हत्येची घटना उघडकीस आली. रवी स्वामीजींच्या मृतदेहाशेजारी मद्यधुंद अवस्थेत बसला होता. ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
शिवानंद स्वामीजींच्या हत्येचा तपास करावा. अन्नदानेश्वर मठ हे म्हैसूर शहरातील प्रमुख मठांपैकी एक आहे. मठाच्या मालमत्तेवर अनेक रियल इस्टेट व्यावसायिकांची नजर होती. त्यामुळे स्वामीजी मालमत्तेच्या रक्षणासाठी तत्पर होते. या पार्श्वभूमीवर त्यांची हत्या झाली का, या दिशेनेही पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.