महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाच वर्षे आमचेच सरकार, मीच पाच वर्षे मुख्यमंत्री

07:00 AM Nov 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सिद्धरामय्या यांचे वक्तव्य : राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Advertisement

बेंगळूर : कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. पाच वर्षे आमचेच सरकार असेल, पुढील पाच वर्षेही मीच मुख्यमंत्री असेन. आगामी निवडणुकीतही काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार आहे, अशी विधाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. सिद्धरामय्या यांच्या या विधानांमुळे राज्य काँग्रेस गोटात उलटसुलट चर्चा रंगली आहे. नेतृत्त्वाच्या मुद्द्यावरून पक्षातील दोन गटांमध्ये भिन्न स्वरुपाची वक्तव्ये केली जात असताना सिद्धरामय्या यांनी आपणच पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्रिपदावर राहणार असल्याचे सांगितले आहे. गुरुवारी होस्पेट येथे सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय आवारात विविध विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. कोणतेही निर्णय हायकमांडशी चर्चा करूनच होतात. उपमुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरही हायकमांडच निर्णय घेणार आहे. सरकारमध्ये तीन उपमुख्यमंत्री राहतील का?, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे; प्रादेशिक पक्ष नव्हे. त्यामुळे अशा मुद्द्यांवर हायकमांड निर्णय घेते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

यावेळी ‘ऑपरेशन कमळ’चे प्रयत्न व्यर्थ

आमदार रमेश जारकीहोळी यांनी काँग्रेसचे सरकार लवकरच कोसळेल, असे भाकीत केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना सिद्धरामय्या म्हणाले, कर्नाटकातील जनतेने काँग्रेसला 136 जागा जिंकून देत बहुमतासह सत्तेवर आणले आहे. पाच वर्षांसाठी आपलाच पक्ष सत्तेवर राहणार आहे. पाच वर्षे मीच मुख्यमंत्रिपदावर राहणार आहे. एकदा ‘ऑपरेशन कमळ’ राबवून यशस्वी झालेल्या भाजपला पुन्हा एकदा हे प्रयत्न करता येईल, असे वाटत आहे. मात्र, यावेळी त्यांचे प्रयत्न व्यर्थ जातील, अशी टिप्पणी सिद्धरामय्यांनी केली. पराभूत झाल्यामुळे भाजप नेते मनाला येईल तसे बोलत आहेत. आम्ही पाच वर्षे सुस्थिर सरकार देऊ. भाजपचा भ्रमनिरास झाला आहे. ते सत्तेवाचून राहू शकत नाहीत. ते पुन्हा ऑपरेशन कमळ राबविण्याचा प्रयत्न करू शकतील. परंतु, यावेळी ते सफल ठरणार नाहीत, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

पक्षातील आमदारांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री बदलाविषयीच्या मुद्द्यावर सिद्धरामय्या संतप्त झाले, त्यांनी आपल्याच पक्षातील आमदारांवर हल्लाबोल केला. काम नसणारे मुख्यमंत्री बदलाविषयी बोलत आहेत. त्यांना कोणतेही काम नसल्यामुळे बेताल वक्तव्ये करत आहेत. सहा महिन्यात सरकार कोसळेल, असे स्वप्न भाजप नेते बसनगौडा पाटील-यत्नाळ बघत आहेत. त्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव रणदीप सुरजेवाला आणि के. सी. वेणुगोपाल राज्य दौऱ्यावर आले आहेत. ते पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी नव्हे; तर लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी. पक्षात कोणताही गोंधळ नाही, आम्ही सर्वजण एकत्र आहोत, असेही सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेसमधील दोन गटात नेतृत्वाच्या मुद्द्यावरून उघडपणे वक्तव्ये केली जात आहे. काही नेत्यांनी सिद्धरामय्याच पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहतील, असे विधान केले होते. तर दुसरीकडे राज्यात अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार असल्याचे विधान काही नेत्यांनी केले होते. दरम्यान, काही प्रभावी नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे बुधवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला आणि के. सी. वेणुगोपाल यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. तसेच पक्षसंघटना आणि अधिकाराच्या मुद्द्यावर कोणीही उघडपणे भाष्य करू नये, अशी सूचना दिली होती. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्रिपदाविषयी केलेल्या विधानामुळे राजकीय गोटात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article