औरंगजेबानेच तोडले मथुरेचे मंदिर! पुरातत्व विभागाकडून खुलासा
भारतीय पुरातत्व विभागाकडून स्पष्टीकरण
► वृत्तसंस्था / आग्रा
उत्तर प्रदेशातील मथुरा येथील भगवान कृष्णाचे पुरातन मंदिर औरंगजेबानेच तोडले होते, असे स्पष्टीकरण भारतीय पुरातत्व विभागाकडून देण्यात आले आहे. माहिती कायद्याच्या अंतर्गत विभागाला एका नागरिकाने हा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर विभागाने माहिती कायद्याच्या तरतुदींच्या अनुसार दिले आहे.
औरंगजेबाच्या काळातील ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे. ही कागदपत्रे 1920 च्या ब्रिटीशकालीन परिपत्रकातील (गॅझेट) आहेत. हे मंदिर केशवदेव मंदिर म्हणून परिचित होते. केशव हे भगवान कृष्णाचेच नाव आहे. औरंगजेबाने कृष्णजन्मभूमीच्या स्थानी असणारे मंदिर तोडण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार त्या मंदिराचा बव्हंशी भाग तोडण्यात आला. नंतर या मंदिराचीच भूमी मशीद बांधण्यासाठी उपयोगात आणण्यात आली. सध्या जी मशीद अस्तित्वात आहे, ती औरंगजेबाच्या आदेशावरुन बांधलेली मशीद आहे. हे सविस्तर उत्तर भारतीय पुरातत्व विभागाने या प्रश्नावर दिलेले आहे.
उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे वास्तव्यास असणारे अजय प्रताप सिंग यांनी माहिती कायद्याअंतर्गत ही माहिती विचारली होती. त्यांच्या प्रश्नांना आग्रा येथील भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयातील पुरातत्व महानिरीक्षकांनी उत्तर दिले आहे. या उत्तरात स्पष्टपणे कृष्णजन्मभूमी असा उल्लेख नाही. मात्र, सध्या तेथे असणारी मशीद ही तेथे पूर्वी असणारे मंदिर तोडूनच औरंगजेबाच्या आदेशावरुन बांधण्यात आली होती, ही बाब या उत्तरावरुन स्पष्ट होते, असे तज्ञांचे मत आहे.
अर्जदार मुक्ती न्यासाचे अध्यक्ष
भारतीय पुरातत्व विभागाला प्रश्न विचाराणारे महेंद्र प्रताप सिंग हे व्यवसायाने विधिज्ञ असून ते श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती न्यासाचे अध्यक्ष आहेत. सध्या कृष्णजन्मभूमीचे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. भारतीय पुरातत्व विभागाचे हे उत्तर या दोन्ही न्यायालयांसमोर मांडणार आहोत, अशी माहिती सिंग यांनी दिली आहे. हे उत्तर हा हिंदूंच्या बाजूचा मोठा पुरावा ठरणार आहे, असे मत तज्ञांनीही व्यक्त केले आहे.