शिरीष देशपांडेंच्या पेनाच्या स्ट्रोकने मुंबईकरांची मने जिंकली
तरुण भारतचे समूहप्रमुख, सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांची प्रदर्शनाला भेट
मुंबई : बॉलपेन या माध्यमाची एक नवीनच ओळख चित्रांच्या माध्यमातून करून देणारे कलाकार शिरीष देशपांडे यांच्या ‘लिव्हिंग विथ लाईन्स’ या मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत भरलेल्या चित्रप्रदर्शनाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून एक नवीन कलाकृती बघायला मिळाल्याच्या प्रतिक्रिया कलारसिकांनी यावेळी दिल्या. मूळचे बेळगावचे असणारे देशपांडे यांनी बॉलपॉईंट पेनाच्या माध्यमातून लाखो स्ट्रोक वापरून, जे ब्रश वापरून करता येणार नाही अशा विविध छटा तयार करत विविध चित्रे साकारली आहेत. यावेळी तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनीही चित्रकार शिरीष देशपांडे यांच्या चित्रप्रदर्शनाला भेट देत देशपांडे यांच्या कलेचे कौतुक केले. यामध्ये प्रामुख्याने बदामी तसेच ग्रामीण भागातील जीवन आणि मुंबई शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. निसर्ग चित्र साकारताना त्यात दाखविलेल्या विविध छटा आणि भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचे व्यक्तीचित्र तर फारच मनमोहक आहे. ही सगळी चित्रे रेखाटताना त्यांनी आपल्या स्ट्रोकच्या ताकदीने ते चित्रात इतके अचुक दाखविले आहेत की, ती
बॉलपेन चित्रांऐवजी फोटोग्राफीच वाटते. ग्रामीण भागातील जीवन अनुभवताना तर थेट डोळ्यासमोर गावचं चित्रच उभे राहते. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेलचे चित्र मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेले आहे. देशपांडे म्हणाले कलेचे उपासक, चित्रकलेचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी व परदेशी रसिकांचा या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बॉलपॉईंट पेनाच्या साहाय्याने निर्मित ही कला अनेकांसाठी नवीन आहे. भारतात मात्र या कलेसाठी कोणी विशेष काम करताना दिसत नाही. ही कला जोपासण्यासाठी नवीन कलाकारांना मी मार्गदर्शन करत आहे. या कलेची एक वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर त्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी माझी पुढाकार घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरीष यांनी पुण्याच्या अभिनव कला विद्यालयातून 1979 मध्ये जीडी आर्ट पूर्ण केले असून त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन हे महाराष्ट्र तसेच भारताच्या प्रमुख शहरात आत्तापर्यंत आयोजित केले आहे. या अभिनव कलेची नव्या कलाकरांना जाणीव तसेच मार्गदर्शन मिळावे यासाठी त्यांनी ‘एक्सप्लोरिंग द बॉलपॉईंट’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी या कलेचे विविध बारकावे आपल्या चित्रांसह समजावून सांगितले आहेत. त्यांना त्यांच्या या कलेच्या आतापर्यंतच्या प्रवासासाठी त्यांच्या पत्नी उज्ज्वला देशपांडे आणि मुलगा तपनेशा देशपांडे यांची विशेष साथ मिळाल्याचे देशपांडे यांनी सांगितले. देशपांडे यांच्या चित्र प्रदर्शनला मुंबईतील बेळगावस्थित लोकांनी खास भेट देत त्यांचे कौतुक केले. हे चित्रप्रदर्शन 7 ऑक्टोबरपर्यंत रसिकांना पहायला मिळणार आहे.