आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल पंधरा तास शर्थीचे प्रयत्न
एका कामगाराचा होरपळून मृत्यू : लिफ्टमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आगीचा भडका
आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी
नावगे क्रॉस येथील स्नेहम कारखान्याला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. कारखान्यातील कामगार आणि परिसरातील लोकांचा थरकाप उडाला आहे. महत्त्वाचे म्हणजे ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलासह, एनडीआरएफ आणि हवाई दलाच्या जवानांना तब्बल पंधरा तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मंगळवारी रात्री घडलेल्या या अग्नितांडवामध्ये एका कामगाराचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर या घटनेत तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. बेळगाव-चोर्ला रोड, नावगे क्रॉसजवळील स्नेहम टेपिंग सोल्युशन्स प्रा. लि. या कारखान्याला मंगळवारी रात्री 8.30 च्या दरम्यान आग लागली. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे. लिफ्टमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कारखान्यात लागलेल्या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले. बेळगाव तालुक्यात इतकी भयावह आग लागण्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे या भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत यल्लाप्पा सन्नयल्लाप्पा गुंड्यागोळ (वय 19) रा. मार्कंडेयनगर, केंचेनट्टी या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर रणजित दशरथ पाटील (वय 39) रा. बहाद्दरवाडी, यल्लाप्पा प्रकाश सालगुडे (वय 35) रा. जुनेबेळगाव, मारुती नारायण कार्वेकर (वय 32) रा. कावळेवाडी हे तीन कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. बेळगाव-चोर्ला रस्त्यावरून जाणाऱ्यांना हे आगीचे दृश्य पाहून धडकीच भरली होती. तर आग लागल्यानंतर कारखान्यातील कामगारवर्गाची एकच पळापळ सुरू झाली होती. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत आग विझविण्यात येत होती.
लिफ्टमध्ये शॉर्टसर्किट आग, होरपळून कामगाराचा मृत्यू
या कारखान्यात तीन शिफ्टमध्ये काम करण्यात येते. मंगळवारी रात्री दुसऱ्या शिफ्टमध्ये काम सुरू होते. यल्लाप्पा गुंड्यागोळ हा पहिल्या मजल्यावरून लिफ्टमधून केमिकलचे तीन डबे घेऊन जात होता. याचवेळी लिफ्टला शॉर्टसर्किट झाले. यानंतर अवघ्या पाचच मिनिटात आगीने पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. शॉर्टसर्किटमुळे लिफ्टचा दरवाजा बंद पडला. त्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही आणि या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाला.
कंपनीत चिकटपट्टी बनवण्याचे काम
या कारखान्यात सुमारे 560 कामगार काम करतात. यामध्ये सकाळी 6 ते 12 पहिली शिफ्ट, दुपारी 2 ते 10 दुसरी शिफ्ट आणि रात्री 10 ते 6 तिसरी शिफ्ट याप्रमाणे काम सुरू असते. या कंपनीत चिकटपट्टी बनवण्याचे काम करण्यात येते. कॉटन, नायलॉन डबल कॉटन, एफआरएटी आदी बनविण्यात येतात. इलेक्ट्रॉनिक वायर व वस्तूंसाठी तसेच रेल्वेकरिता यातील टेप वापरल्या जातात. याचबरोबर जहाजात वापरण्यासाठी वॉटर ब्लॉकिंग टेपही बनविण्यात येतात. यासाठी कच्चा माल म्हणून कॉटन व केमिकल वापरण्यात येते. या कॉटन व केमिकलमुळेच कारखान्याला भीषण आग लागली.
अंदाजे 11 मशीन जळून खाक
मंगळवारी रात्री लागलेल्या या आगीत अंदाजे 11 मशीन जळून खाक झाल्या आहेत. तसेच केमिकल, कपडा कोटिंग आदी साहित्य व इमारत जळाली असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर कंपनीचे नक्की कितीचे नुकसान झाले, याविषयीचा तपशील बुधवारी सायंकाळपर्यंत मिळू शकला नाही. नावगे क्रॉसजवळील मालू ग्रुपच्या पाठीमागे गेल्या सात ते आठ वर्षापूर्वी स्नेहम इंटरनॅशनल हा कारखाना उभारण्यात आला तर 2022 पासून याच ठिकाणी स्नेहम टेपिंग सोल्युशन्स प्रा. लि. या नावाने व्यवसाय उभारण्यात आला. मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास अचानक लिफ्टजवळ शॉर्टसर्किट झाला. ही गोष्ट कामगारवर्गाच्या लक्षात येताच कामगारांनी कारखान्याच्या बाहेर धाव घेतली. याबाबतची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, आगीचे स्वरुप पाहता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी बेळगावसह खानापूर, बैलहोंगल, हत्तरगी, बागलकोट या भागातील आठ पाण्याचे बंब मागवले. तसेच आजूबाजूच्या कारखान्यातील पाण्याचे टँकर व परिसरातील गावांमधील खासगी पाण्याचे टँकर देखील मागवण्यात आले. आग विझविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. तरीही आग आटोक्यात आली नाही. रात्री एकच्या दरम्यान भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (हवाई दल) यांचेही एक पथक आणि वाहन मागवण्यात आले. मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे देखील घटनास्थळी दाखल झाले. तसेच सात ते आठ रुग्णवाहिकाही दाखल झाल्या. त्या बुधवारी सकाळपर्यंत तेथेच होत्या. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दिवसभर कारखान्याच्या आवारात व नावगे क्रॉस ते रणकुंडये क्रॉस परिसरातील रस्त्यावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता.
बुधवारी सकाळ 11.30 वाजता आग आटोक्यात
मंगळवारी रात्री लागलेली आग विझविण्यासाठी पाण्याच्या माऱ्यानंतरही आटोक्यात आली नाही. बुधवारी सकाळी 11.30 वाजता आग आटोक्यात आली. कारखान्याच्या इमारतीमधील लिफ्टमध्ये यल्लाप्पा गुंड्यागोळ याच्या मृतदेहाचा सांगाडा दिसून आला. या आगीत त्याचे संपूर्ण शरीर जळून खाक झाले होते. अधिकाऱ्यांना केवळ त्याची हाडेच मिळाली. बुधवारी सकाळीही कारखान्यात आग धुमसत होती. तसेच धुराचे लोळही निघत होते. ऑक्सिजन जाऊन पुन्हा आगीचा भडका उडू नये, यासाठी इमारतीच्या भिंती व खांब जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात येत होते.
कच्चामालामुळे आगीचा भडका
या टॅपिंग कारखान्यात वापरला जाणारा कच्चामाल हा कापड, फॅब्रिक याचबरोबर ज्वलनशील पदार्थ (पेट्रोल केमिकल्स ) हे वापरण्यात येतो. या कच्च्या मालाला आगीचा स्पर्श झाला. आणि आगीने भडका घेतला. या कच्चामालामुळे आग पेटतच राहिली. त्यामुळे आग आटोक्यात आणता आली नाही.
मुद्दा सुरक्षेचा..
ज्या स्नेहम कारखान्यात आग लागली आहे. संबंधित मालकाने जागेची योग्य प्रकारे निवड केली आहे का? इमारत व्यवस्था आहे का? तसेच खेळत्या हवेसाठी नियोजन व कारखान्यात हाताळण्यासाठी माणसे अथवा अधिकारी वर्ग तज्ञ आहेत का? तसेच ते किती अनुभवी आहेत, तसेच डीजी ट्रेनिंग पास केलेले आहेत का? या कंपनीच्या सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे.
नियमांचे पालन महत्त्वाचे..
एखाद्या कंपनीसाठी सरकारी नियम लागू करण्यात आलेले असतात. याचबरोबर कामगार कायद्यानुसार बरेच नियम आहेत. या सर्व नियमांचे परिपूर्ण पालन करण्याची जबाबदारी ही संबंधित कारखान्याच्या मालक व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट यांच्यावरती असते. याचे पालन होणेही गरजेचे आहे. कारण नावेक्रॉस जवळ कारखान्याला लागलेल्या आगीमुळे अन्य कारखानदारांनीही बोध घेणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.
कुटुंबीयांचा एकच आक्रोश
कारखान्याच्या आवारात मृत यल्लाप्पा याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. आपल्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांनी टाहो फोडला. बुधवारी सकाळी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. तसेच अग्निशमन दलाचे डीएफओ शशीधर निलगार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आग विझविण्यासाठी जीवाची पर्वा न करता प्रयत्न केले. भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांचे फायर इनचार्ज मोहनी शंकर, फायर क्रू इनचार्ज सुभाष पाटील व चंदन रावराणे हे उपस्थित होते. स्नेहम टेपिंग हा कारखाना संतिबस्तवाड ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतो. आग लागल्यापासून बुधवारी दिवसभर तहसीलदार बसवराज नागराळ, उचगाव सर्कल राजू गलगली तसेच नावगेचे तलाठी एम. एच. बुदिहाळ हेसुद्धा ठाण मांडून होते. बुधवारी सकाळी 11.30 वाजल्यापासून यल्लाप्पा याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जेसीबीच्या साहाय्याने भिंत हटवून त्याचा मृतदेह दुपारी बाराच्या दरम्यान बाहेर काढण्यात आला. मात्र, आगीत पूर्णपणे जळाल्यामुळे केवळ सांगाडाच शिल्लक होता. तर त्याची हाडे उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली. यल्लाप्पा याच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. बुधवारी 3 वाजता मार्कंडेयनगर, केंचेनट्टी येथे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जीव वाचविण्यासाठी असे केले धाडस
कारखान्याला आग लागल्यानंतर कामगार कारखान्याच्या बाहेर पळून येऊ लागले. यावेळी काही कामगारांनी कठड्यावरून उड्या टाकल्या. तर दुसऱ्या मजल्यावर काम करत असलेले रणजित पाटील, यल्लाप्पा सालगुडे, मारुती कार्वेकर यांना मात्र या आगीतून बाहेर पडता आले नाही. बाहेर असलेल्या कामगारांनी एक दोरी खिडकीतून त्यांच्याकडे टाकली व खिडकीला दोरी बांधून बाहेरील एका बोलेरो वाहनाला दोरी बांधून कामगारांनी ती खिडकी मोडून काढली. यानंतर दुसऱ्या मजल्यावर असलेल्या त्या तिघाही कामगारांनी जीव वाचविण्यासाठी खिडकीतून उड्या मारल्या. यामध्ये मारुती कार्वेकर यांच्या हाताला मार लागला. तर यल्लाप्पा सालगुडे याच्या कंबरेला दुखापत झाली. तर रणजित याला आगीची झळ बसली आहे. खिडकीतून उडी टाकण्याचे धाडस केल्यामुळे या तिघांचा जीव वाचला, अशी माहिती काही कामगारांनी दिली.
केवळ अस्थीच वडिलांकडे सुपूर्द
मंगळवारी दुपारच्या शिफ्टला कामावर गेलेला आपला मुलगा घरी परतलाच नाही. लागलेल्या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर मृत व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे दिला जातो. मात्र, यल्लाप्पाच्या आई-वडिलांना त्याचे अंत्यविधीपूर्व तोंड पाहण्याचे भाग्यही मिळाले नाही. उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या मुलाची केवळ अस्थीच एका पिशवीत घालून वडिलांकडे देण्यात आली. यावेळी मात्र आई-वडिलांना केलेला आक्रोश पाहून साऱ्यांचेच डोळे पाणावले. आपले कुटुंब आणि पोट ज्या कारखान्यावर चालते, त्या कारखान्याची झालेली भीषण दूरवस्थेमुळे कामगार विमनस्क झाले आहेत. कारखान्याचा काही भाग जेसीबीने पाडविण्यात येत असल्याचे पाहून समस्त कामगारांना अश्रू अनावर झाले. बुधवारी सकाळी कारखान्यासमोर ते सुन्नपणे बसून होते.
आग लागली तरीही पगार मिळाला..
बेळगाव परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये कामगारांना सहसा दि.7 व दि.10 रोजी या दिवशी त्या कंपनीतील कामगारांचा पगार जमा होतो. स्नेहम या कारखान्याला दि. 6 रोजी आग लागली आणि हा कारखाना जळून खाक झाला. मात्र तरीही या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना दि. 6 रोजी व 7 रोजी त्यांच्या बँक खात्यावर त्यांचा पगार जमा झाला. यामुळे आग लागलेल्या दिवशीही कामगारांना पगार मिळाला. कारखान्याला आग लागली तरीही कामगारांना पगार मिळाला. कारण कामगार वर्ग हा आपल्या पगारावरती अवलंबून असतो. यावर त्यांचा उदरनिर्वाह असतो. यावरून कामगारांप्रती असलेली कारखान्याची कार्यतत्परता दिसून आली.
आम्ही मालकासोबत..
कारखान्याला आग लागल्यामुळे बुधवारपासून स्नेहम मध्ये येण्राया कामगारांना काम करता आले नाही. मात्र कारखान्याला लागलेली आग व जेसीबीने काढण्यात येणारी इमारत पाहण्यासाठी कामगारांची गर्दी दिसून आली. या परिस्थितीत आम्ही आमच्या मालकासोबत आहोत. त्यांनी केव्हाही कधीही नव्याने उद्योग धंदा उभारतील त्यावेळेला आम्ही त्यांच्यासोबत आहोत. तसेच ते ज्या पद्धतीने आम्हाला सूचना करतील त्याचे आम्ही पालन करणार, असे काही कामगारांनी सांगितले.
स्नेहमच्या संचालकांविरुद्ध एफआयआर : बळी पडलेल्या कामगाराच्या वडिलांकडून तक्रार दाखल
नावगे क्रॉसजवळील स्नेहम इंटरनॅशनल कारखान्यातील आग दुर्घटनेसंबंधी व्यवस्थापन मंडळाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत बळी पडलेल्या तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात संचालक व संचालक मंडळाविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास स्नेहम इंटरनॅशनल या इन्सुलेशन टेप तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली होती. या आगीत यल्लाप्पा ऊर्फ यलगोंडा सन्नयल्लाप्पा गुंड्यागोळ (वय 19) रा. मार्कंडेयनगर या तरुणाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन कामगार जखमी झाले आहेत. यल्लाप्पाचे वडील सन्नयल्लाप्पा तम्माण्णा गुंड्यागोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारखान्याचे संचालक अनिल अमरनाथ मेत्राणी, सुनीश अमरनाथ मेत्राणी दोघेही राहणार हिंदवाडी व स्नेहम इंटरनॅशनल कारखान्याच्या संचालक मंडळाविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. दुर्लक्षपणाचा ठपका ठेवत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
भारतीय न्याय संहिता कलम 106 (1), 125 (बी), 287, 288, सहकलम 190 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी आदी अधिकारी पुढील तपास करीत आहेत. या आग दुर्घटनेत नेमके कितीचे नुकसान झाले आहे? याची ठोस माहिती बुधवारी रात्रीपर्यंतही उपलब्ध झाली नाही. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त रोहन जगदीश आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तब्बल दोनवेळा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे. दरम्यान, जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.