For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकादशी दिवशी दमदार पावसाने झोडपले

11:32 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
एकादशी दिवशी दमदार पावसाने झोडपले
Advertisement

दिवसभर संततधार, सर्वत्र पाणीच पाणी : जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी 5.30 पर्यंत 22.4 मि.मी. पावसाची नोंद

Advertisement

बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी वाढला असून दिवसभर संततधार कोसळला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. आषाढी एकादशी दिवशीच दमदार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. जिल्ह्यात मंगळवारी 15.6 मि.मी. पावसाची नोंद झाली तर बुधवार दि. 17 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत 22.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.यावर्षी सध्यापर्यंत पावसाने उत्तम साथ दिली आहे. बुधवारी पहाटे दमदार पाऊस कोसळला. त्यानंतर दिवसभर संततधार सुरू होती. या पावसामुळे शहरासह उपनगरातील सखल भागांमध्ये पाणी साचून होते. दमदार पाऊस कोसळल्यानंतर काहीवेळ पाऊस उसंत घेत होता. त्यामुळे पाण्याचा निचरा होत होता.

शहरातील जनजीवन विस्कळीत

Advertisement

पहाटेपासूनच सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. फेरीवाले, भाजीविक्रेते यांसह इतर व्यावसायिकांची पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनाही पावसात भिजतच खरेदी करावी लागली. आषाढी एकादशी असल्याने शहरातील विठ्ठल-रखुमाई मंदिरांसमोर दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या होत्या. त्यांना पावसातच उभे राहून दर्शन घ्यावे लागले. संततधार पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचून होते. काही ठिकाणी गटारींमध्ये कचरा अडकून गटारींचे पाणी रस्त्यांवरून वाहत होते. त्यामधून वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली. दिवसभर संततधार पाऊस असल्याने साऱ्यांनाच रेनकोट, जॅकेट व छत्र्यांचा आधार घ्यावा लागला. या पावसामुळे शहरातील नाल्यांनाही पाणी अधिक झाले होते. लेंडी नाला व बळ्ळारी नाल्यामध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे. काही ठिकाणी हा नाला फुटून शिवारात पाणी शिरले आहे.

नदी-नाल्यांना पाणी 

दोन दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे नदी व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. पावसाला असाच जोर राहिला तर नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे भातलावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना हा पाऊस फायद्याचा ठरला आहे.

घरांमध्ये शिरले पाणी

वडगाव येथील आनंदनगर, समर्थनगर, नानावाडी, मंडोळी रोड या परिसरात गटारींमधील पाणी रस्त्यांवरून वाहताना दिसत होते. दरवेळीच या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहात आहे. पावसाचा जोर वाढला तर अनेकांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता आहे. सध्या काही घरांमध्ये पाणी शिरले होते. मात्र पावसाचे प्रमाण वाढले तर अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.