Devendra Fadanvis | सोलापुरात येत्या तीन वर्षात आयटी पार्क उभारणार : मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
सोलापूरच्या विकासासाठी कोट्यवधींची घोषणा,
सोलापूर : सोलापुरात फंक्शनल विमानतळ सुरू झाल्याने येथे आयटी पार्क उभारण्याची योजना राज्य शासनाने आखली आहे. या पार्कसाठी जागेची निश्चिती होत असून येत्या तीन वर्षात हे पार्क उभारून स्थानिकांना येथेच रोजगार उपलब्ध करून देणार आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सोलापुरात केले.
सोलापूर- मुंबई विमानसेवेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सोलापूर महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापूरकरांवर अक्षरशः आश्वासनांची खैरात केली. सोलापूर शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी 1 हजार कोटी मंजूर केल्याचे सांगत त्यांनी येत्या तीन वर्षात सोलापुरात आयटी पार्क निर्माण करू, सोलापुरात मोठ्या विमानांना उतरण्याची सोय करू तसेच अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपर्यंत मदत पोहोचवण्याची ग्वाही दिली.
सोलापुरात समांतर जलवाहिनी योजनेचे काम पूर्ण झाले. यानंतर सोलापूरला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी वितरण व्यवस्था सुधारणा आवश्यक असून याकरिता आपण 1000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आगामी काही वर्षांनी सोलापुरात दररोज चांगला पाणीपुरवठा होईल. माता भगिनींना नळ सुरु केले की पाणी उपलब्ध होईल. 24 तास पाणीपुरवठा होणाऱ्या शहरांमध्ये सोलापूरचा समावेश होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतकरी व लाडक्या बहिणींची दिवाळी चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी त्यांना दिवाळी भेट देत आहेत. पालकमंत्री व प्रशासन सर्व प्रकारची शिधा व व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ज्या ज्या वेळी शेतकरी संकटात असतो अशावेळी सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी असतो. राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले संपूर्ण नुकसान आम्ही भरून काढू शकत नाही मात्र त्यांच्यासाठी 32 हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. काही जणांना दिवाळीपूर्वी तर काही जणांना दिवाळीनंतर खात्यात ही मदत पोहोचणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा त्यांच्या पायावर उभे करणार आहोत.