For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवजात बालकाची-मातेची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य

10:59 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
नवजात बालकाची मातेची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य
Advertisement

आरोग्य मंत्री दिनेश गुंडुराव यांचे प्रतिपादन : खानापुरात माता-शिशू दवाखान्याचे थाटात उद्घाटन 

Advertisement

खानापूर : राज्यातील नवजात बालकाची आणि मातेची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य असून ती जबाबदारी सरकार चोखपणे पार पाडत आहे. गर्भवती आणि मुलाचे संगोपन चांगल्यारितीने व्हावे, यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. मुलाच्या गर्भधारणेपासूनच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पोषण आहार आणि औषधांचे नियोजन शासन करत आहे. सदृढ समाजासाठी मुलांच्या बाल्यावस्थेतच त्यांच्या आरोग्याची पायाभरणी करणे गरजेचे आहे, असे उद्गार आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी येथील माता-शिशू 60 खाटांच्या दवाखान्याच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठल हलगेकर होते.

सुरुवातीला 60 खाटांच्या माता-शिशू दवाखान्याचे उद्घाटन आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर नव्याने उभारण्यात येणाऱ्या शंभर खाटांच्या दवाखान्याचे भूमिपूजन आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव, सतिश जारकीहोळी यांच्या हस्ते झाले. तर फलकाचे अनावरण सतिश जारकीहोळी आणि माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

यानंतर झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला तालुका आरोग्य अधिकारी महेश किवडसन्नावर यांनी उपस्थितांचे स्वागत करून खानापूरच्या दवाखान्यासंदर्भात माहिती स्पष्ट केली. तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या शंभर खाटांच्या दवाखान्याच्या भूमिपूजनाबाबत शासनाकडून मंजूर झालेल्या निधीबाबत माहिती दिली. यानंतर खानापूर आरोग्य विभागाच्यावतीने मंत्री, आमदार आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले, माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नातून माता-शिशू दवाखान्याची इमारत उभारण्यात आली. आणि शंभर खाटांच्या दवाखान्यासाठी माजी आमदार अंजली निंबाळकर तसेच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी प्रयत्न केले आहेत.

तालुक्याचा विकास व्हावा हीच अपेक्षा

माजी आमदार अंजली निंबाळकर म्हणाल्या, मी आमदार असताना या दवाखान्यासाठी प्रयत्न केले आणि माझ्याच हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. आज उद्घाटन होत असताना आनंद होत आहे.

महिलांच्या आरोग्याची देखभाल या दवाखान्यातून निश्चित 

तालुक्यातील महिलांच्या आरोग्याची देखभाल या दवाखान्यातून निश्चित होणार आहे. विकासकामाबाबत निश्चितच काँग्रेसकडून धोरणात्मक निर्णय घेतले जातील आणि तालुक्याच्या विकासासाठी सरकादरबारी माझ्याकडून पाठपुरावा निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, मी कोणत्याही विकासकामाच्या श्रेयवादात पडणार नाही. कुणाकडूनही तालुक्याचा विकास व्हावा, हीच माझी खरी तळमळ आहे. तालुका दुर्गम असल्याने शासनाने तालुक्याच्या विकासासाठी अग्रक्रम द्यावा, हीच माजी मागणी आहे.

नव्याने सात तालुकास्तरीय दवाखान्यांना मंजुरी 

काँग्रेस सरकार विकासकामात राजकारण करणार नाही, राज्यात नव्याने सात तालुकास्तरीय दवाखान्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील खानापूर एक आहे. या दवाखान्याची अद्ययावत इमारत होणार असून सर्व रोगांवरील उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच या दवाखान्याच्या निविदा प्रक्रिया येत्या आठ-दहा दिवसात पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. जुना दवाखाना पूर्णपणे पाडवून या ठिकाणी आराखड्यानुसार तीन मजली इमारत उभारण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यात ही इमारत बांधून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, आणि माझ्याच हस्ते दवाखान्याचे उद्घाटनही होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठीही आपण प्रयत्न करू, आणि तालुक्यातील इटगी, कणकुंबी, खानापूर, नंदगड, पारिश्वाड या दवाखान्याच्या विस्तारीकरणासाठी साडेतीन कोटीचा निधी मंजूर केल्याचे त्यांनी जाहीर केले.

Advertisement
Tags :

.