शिक्षणाद्वारे समाजात परिवर्तन घडविणे शक्य
केंद्रीय मंत्री सोमण्णा : केएलईचा 109 वा स्थापना दिन : केएलई संस्थेचे ज्ञानदानाचे कार्य प्रशंसनीय
बेळगाव : मनाच्या श्रीमंतीमुळे समाजात कोणतेही कार्य सुलभ होऊ शकते, हे केएलई संस्थेच्या संस्थापकांनी व विद्यमान कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी जनतेला समजावून दिले आहे. शिक्षणाद्वारे समाजात परिवर्तन घडवून आणणे शक्य आहे. ज्ञानदान करण्याचे केएलई संस्थेचे कार्य प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी केले. केएलई संस्थेचा 109 वा स्थापना दिन गुरुवार दि. 14 रोजी साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने नेहरूनगरातील केएलई सेंटेनरी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने मंत्री सोमण्णा बोलत होते. अध्यक्षस्थानी केएलई संस्थेचे अध्यक्ष महांतेश कौजलगी व व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, कार्यवाह बी. जी. देसाई उपस्थित होते.
सोमण्णा म्हणाले, केएलई संस्थेची कार्यपद्धती व विकासाला सात संस्थापक शीर्षकांचे आशीर्वाद आहेत. उत्तर कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांमध्ये केएलईच्या शिक्षण संस्था आहेत. दक्षिण कर्नाटकात शिक्षण संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केएलई संस्थेकडून व्हावा. केएलई संस्थेचे विद्यार्थी देश-विदेशात कार्यरत असून ही संस्थेलाच नव्हे तर संपूर्ण राज्यालाच अभिमानास्पद बाब आहे. उत्तम शिक्षण संस्था अशी केएलईची ओळख आज देशपातळीवर होत असून संस्थेने देशासमोर एक आदर्श ठेवला आहे.
यावेळी डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, सात शिक्षकांच्या कठोर परिश्रमांतून केएलई संस्था उभारली असून अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने संस्थेची प्रगती झालेली आहे. लोककल्याणाची उद्दिष्टे ठेवून ज्ञानदान करण्याचे कार्य शिक्षकांनी सुरू ठेवल्यामुळेच आज संस्था जागतिक स्तरावर पोहोचली आहे. बेळगाव-पुणे व बेळगाव-बेंगळूर वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात यावी, बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करून जनतेला सोयीचे करून द्यावे, अशा मागण्याही डॉ. कोरे यांनी मांडल्या. केएलई संस्थेने उभारलेले 300 खाटांचे कॅन्सर रुग्णालयाचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते येत्या डिसेंबरमध्ये होणार असल्याचेही डॉ. कोरे यांनी सांगितले.
वैद्यकीय क्षेत्रात आज तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. ग्रामीण भागाला या वैद्यकीय सेवा सुलभपणे मिळत आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा वेळेत मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. 50 वर्षांपूर्वी बेळगावात उभारलेल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय विज्ञान महाविद्यालयात अनेक विद्यार्थी घडले असून त्यांनी वैद्यकीय व्यवसायात आपले जीवन समर्पित केले आहे. यावेळी निमंत्रित पाहुणे म्हणून रुबी हॉल क्लिनिकचे (पुणे) मुख्य हृदयरोग तज्ञ डॉ. परवेझ ग्रँट उपस्थित होते. यावेळी डॉ. महेश गुरनगौडर, डॉ. नेहा धडेद, डॉ. आदित्य आचार्य आदी उपस्थित होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरावर उल्लेखनीय कार्य केलेल्या केएलई संस्थेच्या विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. दीपा मेटगुड यांनी आभार मानले.
उर्वरित रेल्वे फाटकांवर उड्डाणपूल
बेळगाव शहरात सर्व रेल्वे फाटकांवर उड्डाण पूल उभारण्यात येतील. राज्यातील योजनाही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार बेळगाव-धारवाड रेल्वेमार्ग निर्माणावेळी येणाऱ्या अडीअडचणी दूर करून कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही मंत्री सोमण्णा म्हणाले.