दहशतवाद तोडणे हा आमचा अधिकार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राज्यसभेत हुंकार, विरोधकांवर घणाघात, शंकांना समर्पक प्रत्युत्तर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दहशतवादाची यंत्रणा उद्ध्वस्त करणे हा आमचा अधिकारच आहे. पाकिस्तानने दहशतवादाला आश्रय देणे थांबविले नाही, तर त्या देशाला आणखी मोठा धडा शिकविला जाईल. दहशतवादाविरोधात भारताने हाती घेतलेले ‘सिंदूर अभियान’ थांबलेले नाही. ते केवळ तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे. पाकिस्तानने पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न केल्यास त्याचे कंबरडे मोडले जाईल, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत केला आहे.
बुधवारी राज्यसभेत पहलगाम हल्ला आणि ‘सिंदूर अभियान’ संबंधातील महाचर्चा पूर्ण झाली. अमित शहा यांनी चर्चेला उत्तर देताना भारताची दहशतवादासंबंधीची भूमिका पुन्हा एकवार स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या गेल्या 11 वर्षांच्या काळात दहशतवादाविरोधात भेदक आणि आक्रमक कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे दहशतवादाच्या प्रमाणात 70 टक्के कपात झाली आहे. आमच्या विरोधकांनी मात्र, सेनादलांच्या कर्तृत्वावर आणि पराक्रमावर विश्वास न ठेवता पाकिस्तानला बळ देण्याचा प्रयत्न चालविला आहे. जनता हे सर्व पहात आहे, असा आरोपही त्यांनी त्यांच्या भाषणात केली आहे.
सेनादलांचे मन:पूर्वक आधार
‘सिंदूर अभियाना’त भारताच्या तिन्ही सेनादलांनी प्रचंड पराक्रम गाजवला. त्यांनी संयुक्तरित्या पाकिस्तानला आणि दहशतवादाला पाणी पाजले. दहशतवाद्यांचे 9 तळ आणि पाकिस्तानचे 11 वायूतळ पूर्णत: नष्ट करण्यात आले. ‘सिंदूर अभियान’ त्यांच्या अतुलनीय साहसाने यशस्वी झाले. केंद्र सरकार आपल्या सेनादलांचे यासाठी मन:पूर्वक आभार मी मानतो, असे भावोत्कट उद्गार त्यांनी काढले.
‘सिंदूर अभियान’ युद्ध नव्हे
भारताने हाती घेतलेले ‘सिंदूर अभियान’ हे युद्ध नव्हते. तो दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठीचा संघर्ष असल्यामुळे त्याची कोणत्याही युद्धाशी तुलना करणे हास्यास्पद आहे. आम्ही हे अभियान हाती घेताना विशिष्ट उद्दिष्ट्यो निर्धारित केली होती. ती सध्यापुरती पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या बाजूने उभे राहून भारताच्या नागरी वस्त्यांवर आणि सेना आस्थापनांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तथापि, आम्ही हा प्रत्येक हल्ला आकाशातच उद्ध्वस्त केला. भारताने पाकिस्तानवर केलेले हल्ले मात्र यशस्वी आणि अचूक होते. त्यामुळे पाकिस्तानची जबरदस्त हानी झाली. परिणामी त्या देशाने आम्हाला हल्ले थांबविण्याची विनंती केली. म्हणून आम्ही शस्त्रसंधी केली, असा घटनाक्रमही अमित शाह यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केला आहे.
सेनेला पूर्ण मोकळीक
पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारतीय सेनादलांना पूर्ण सूट आणि स्वातंत्र्य देण्यात आले होते. कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर निर्बंध घालण्यात आले नव्हते. त्यांनी आपली कामगिरी अत्यंत चोखपणे केली. सरकार आणि जनता यांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविलेला आहे. यासाठी केंद्र सरकार आणि या देशाची जनता त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
विरोधकांवर घणाघात
दहशतवादाच्या समस्येला काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणाचा लाभ दहशतवाद्यांना मिळाला. घटनेचा 370 वा अनुच्छेद काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणाचे उदाहरण आहे. काश्मीरचा मोठा भाग पाकिस्तानच्या घशात जाऊ देण्याचे काम काँग्रेसनेच केले आहे. मतपेटीच्या राजकारणासाठी देशहिताकडे आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेकडे दुर्लक्ष याच पक्षाने आपल्या सत्ताकाळात केले. त्यामुळे देश दुर्बळ राहिला आहे. त्याची फळे काँग्रेसही भोगत आहे. आज तेच आम्हाला जाब विचारत आहेत, अशी खोचक टीका त्यानी केली.
दहशतवाद संपविण्याचा संकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवादाला नष्ट करण्यासाठी कृतसंकल्प आहेत. त्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्यासाठी ते सज्ज आहेत. देशाची संरक्षण व्यवस्था त्यांचाच धोरणामुळे ‘आत्मनिर्भर’ होत आहे. या स्वदेशी सामर्थ्याची चुणूक ‘सिंदूर अभियाना’त दिसून आली आहे. भारताचे हे स्वबळावरील वाढते सामर्ध्य विरोधकांना पाहवत नाही. म्हणून ते बिनबुडाच्या शंका उपस्थित करीत आहेत आणि स्वत: हास्यास्पद ठरत आहेत, असे टोलेही अमित शाह यांनी लगावले आहेत.
विरोधकांचा सभात्याग
अमित शहा चर्चेला उत्तर देण्यासाठी उभे राहिल्यानंतर विरोधकांनी गदारोळ करण्यास प्रारंभ केला. चर्चेला उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच द्यावे, अशा त्यांची मागणी होती. तथापि, पंतप्रधानांनी लोकसभेत चर्चेला उत्तर दिले आहे. परिणामी, राज्यसभेतील उतरदायित्व माझ्यावर सोपविण्यात आले आहे, असे प्रतिपादन शाह यांनी केले. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात न आल्याचा निषेध करीत सभात्याग केला. त्यामुळे शाह यांच्या उत्तराच्या वेळी विरोधी बाके रिकामी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात न येणे हा या सभागृहाचा अपमान आहे, अशी टीका केँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी हस्तक्षेप करताना केली.
जयशंकर यांचे स्पष्टीकरण
शस्त्रसंधी करताना भारताने कोणाचीही मध्यस्थी स्वीकारलेली नाही. पाकिस्तानच्या विनंतीवरूनच शस्त्रसंधी झाली. संघर्षाचे रुपांतर युद्धात न करण्याचा भारताची भारताची प्रारंभापासून योजना होती. त्यानुसारच आम्ही कार्य केले. कोणत्याही देशाने किंवा नेत्याने मध्यस्थी केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संपूर्ण कालावधीत दूरध्वनी किंवा अन्य मार्गाने संपर्क केलेला नाही, असेही जयशंकर यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले.
चर्चा समाप्त
ड ‘सिंदूर अभियानावरील चर्चा संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संपूर्ण
ड पहलगाम हल्ला केंद्र सरकारच्या ढिसाळपणामुळे झाल्याचा आरोप
ड विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला अमित शाह यांचे राज्यसभेत उत्तर